आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधान सचिवांनी दिले तातडीने काम करण्याचे आदेश, विशेष अधिका-यांची कामात दिरंगाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराची कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी नऊ प्रभागांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोमवारपासून या अधिकाऱ्यांनी कामाला प्रारंभ केला आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. या वेळी स्वच्छता निरीक्षक आणि जवानांनाही मार्गदर्शन करून वॉर्डांची पाहणी करण्यात आल्याचे समोर आले. 


म्हैसकर यांनी नऊ प्रभागांसाठी नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषदांचे अधिकारी प्रभाग प्रमुख म्हणून नियुक्त केले आहेत. यात विक्रम मांडुरके यांना अतिरिक्त कारभार देऊन घनकचरा विभागप्रमुखपदाची सूत्रे देण्यात आली. शहरात नऊ प्रभागांत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी कामाला प्रारंभ केला आहे. काही अधिकाऱ्यांनी सकाळी तर काहींनी दुपारी शहरात येऊन वॉर्डांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, तर काही विशेष अधिकाऱ्यांनी प्रभाग सातमध्ये थेट कंपोस्टिंग प्रकल्पाला छोटेखानी स्वरूपात सुरुवात केली आहे. सोमवारी कामाचा पहिला दिवस असला तरी वॉर्डातील जागा पाहणी, कंपोस्टिंगचे स्थळ, सुका कचरा करण्यासाठीचे स्थळ, रस्त्यावर कोणत्या ठिकाणी कचरा साचतो अशी ठिकाणांची पाहणी केली. तसेच मंगळवारपासून जोरदार कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

आज करणार जागा निश्चित 
सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांसाठी शहरातील काही भाग अनोळखी असल्याने त्यांनी सोमवारी प्राथमिक पाहणी करून माहिती घेतली. तसेच जागांची व स्थानिकांची स्थिती बघून घेतली. जागा अंतिम करण्यासाठी मंगळवारपासून प्रारंभ होईल. याच दिवशी सर्वाधिक प्रभागातील जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. 

 

दोन दिवसांत तीन हजार टन कचरा संपवणार : भापकर 
शहरातील ९ झोनमध्ये मिळून तीन हजार टन कचरा साचला आहे. दोन दिवसांत या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल. तसेच येत्या आठ दिवसांत कचरा प्रश्न संपवणार असल्याची माहिती सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा प्रश्नावर आयोजित बैठकीत दिली, तर कचरा टाकण्यासाठी जवळपास पंधरा एकर जागेचा शोध सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.कचऱ्याच्या प्रश्नांसंदर्भात वाॅर्ड अधिकाऱ्याची बैठक विभागीय आयुक्तांनी घेतली. या वेळी जिल्हाधिकारी एन. के. राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती. 

 

प्रत्येक प्रभागात लागणार एक एकर जागा : भापकर म्हणाले, नऊ प्रभागांसाठी प्रत्येकी किमान एक एकर जागा लागणार आहे. प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये काही समस्या आहेत. ९ झोनमध्ये १८०० मेट्रिक टन असा तीन हजार मेट्रिक टन कचरा आहे. त्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेल आणि मंगल कार्यालयाचा कचरा इकडे तिकडे टाकण्यात येत आहे. त्यांनी कचऱ्याचे कंपोस्टिंग करावे, अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र, या नऊ प्रभागांतील जागा कोणत्या हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

 

कचऱ्याचे कंपोस्ट करून शेतकऱ्यांना खत मोफत देण्यात येणार आहे. त्यांना याचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. तसेच कचरा वॉर्डावॉर्डात जिरवावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचरा प्रक्रियेसाठी कोणत्या मशीन घ्यायचा याचा निर्णय मनपानेच घ्यावा, असे भापकर म्हणाले. ५ मेट्रिक टन प्रक्रिया करणारी मशीन ६५ लाख, तर २०० मेट्रिक टनची मशीन १ कोटीपर्यंत येते. आम्ही जागा शोधून देऊ शकतो, प्रक्रिया मात्र मनपानेच करावी. 


कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी कंपन्यांकडून मागवले प्रस्ताव 
नारेगावात साचलेला कचरा तसेच दैनंदिन पातळीवर तयार होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने १५ वर्षांपूर्वीच पावले उचलायला हवी होती. परंतु नारेगावकरांनी नाक दाबल्यानंतर अखेर प्रशासनाचे तोंड उघडले असून आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी इच्छुक कंपन्यांचे प्रस्ताव महापालिकेने मागवले आहेत. यात नव्या तसेच जुन्या कचऱ्यापासून खत निर्मितीचाही समावेश आहे. नारेगाव तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून महापालिकेची कचराकोंडी केली. 

 

शहराची कचराकोंडी फोडण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आता वेंगुर्ला येथे "शून्य कचरा' अभियानाद्वारे घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे कर्जतचे विद्यमान मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना औरंगाबादेत पाठवले आहे. सोमवारी त्यांनी शहरात फेरफटका मारत कामाला सुरुवात केली. सोमवारी सकाळी शहरात येताच त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह शहरातील विविध भागांत पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, "हा प्रश्न एवढा गंभीर नाही. आठ दिवसांत तोडगा निघेल.' 


पंधरा एकर जागेचा शोध घेणार 
जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले की, मनपा नऊ प्रभागांत कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. त्याशिवाय सेफ जागा म्हणून प्रक्रियेसाठी १५ एकर जागेची गरज आहे. त्याचा शोध सुरू असून ज्या ठिकाणी लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. 

औरंगुपऱ्यातील जि. प. मैदानावर सोमवारी मनपाच्या पथकाने कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील रहिवाशांनी विरोध केल्यामुळे पथकाला माघारी फिरावे लागले. 

 

काही अधिकारी कामात व्यग्र 
सोमवारी काही अधिकारी मंत्रालयात अधिवेशनासाठी गेले असले तरी सायंकाळनंतर त्यांनी शहरात येऊन वॉर्डांची माहिती घेतली. त्यामुळे काही ठिकाणी जोमाने तर काही ठिकाणी ओळख परेडची मोहीम करण्यात आल्याचे दिसून आले. वॉर्डात फिरत असताना नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

एका महिन्यापासून आयुक्त महापालिकेकडे फिरकेनात 
गेल्या १६ फेब्रुवारीपासून महापालिकेची कचराकोंडी झाली अन् तेव्हापासून सर्वसाधारण सभेचा अपवाद वगळता आयुक्त दीपक मुगळीकर मुख्यालयाकडे फिरकलेच नाहीत. 'जलश्री' या शासकीय बंगल्यात बसून ते कारभार चालवतात. अर्थात तेथे सामान्यांना प्रवेश नाही. त्यामुळे ज्यांच्या काही तक्रारी आहेत, अशा अभ्यागतांनी जायचे कोठे, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देण्यासाठीही ते उपलब्ध होत नाहीत. मुगळीकर पूर्वी आठवड्यातून तीन दिवस तरी अभ्यागतांसाठी उपलब्ध असत. मात्र कचराकोंडीत आयुक्तांचीही कोंडी झाली अन् त्यांनी कार्यालयाकडे तोंडच फिरवले. 

 

मांडुरके पुन्हा मनपात 
विक्रम मांडुरके यांनी २०१६-१७ मध्ये मनपात घनकचरा विभागप्रमुख होते. त्यानंतर त्यांची घनसावंगी येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. आता पुन्हा त्यांना याच विभागात आणण्यात येणार आहे. 

 

आजपासून शेडही लागणार 
काही वॉर्डांत कोणत्याही प्रकारची दुर्गंधी न करता कंपोस्टिंग आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि मशीनच्या साहाय्याने कचऱ्यावर विद्युत व खत प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मंगळवारपासून कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने शेड टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. 

 

३ हजार टन कचरा पडून असल्याचा मनपाचा दावा 
शहरात विविध ठिकाणासह प्रभाग १, २ आणि तीन मध्ये कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचरा टाकण्यासाठी जागेची अडचण येत असल्याने तीन हजार टन कचरा पडून असल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. प्रत्यक्षात मात्र पाच हजार टनपेक्षा जास्त कचरा रस्त्यावर आणि वॉर्डांमध्ये पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या २४ दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नाही. शहराच्या आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनीही कचरा टाकण्यास विरोध केला आहे. त्यामुळे मनपाकडून शहरातच कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत साडेतीन हजार टन कचरा बाहेर नेऊन टाकला. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एक टन कचराही बाहेर गेलेला नाही. त्यामुळे शहरात पाच हजार टन कचरा साचला तरी महापौर घोडेले केवळ तीन हजार टन कचरा साचल्याचे सांगत आहेत. 

 

प्रभागनिहाय साचलेला कचरा 
प्रभाग एक- १५० टन, प्रभाग दोन- ४५०, प्रभाग तीन-८०० टन, प्रभाग सात- २०० टन, प्रभाग सहा- १०० टन, प्रभाग नऊ मध्ये २०० टन कचरा साचल्याची आकडेवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली. 

 

जागा सांगण्यास नकार 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ झोनमधील जागा निश्चिती झाली आहे काय, असे विचारले असता अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी जागा सांगण्यास नकार दिला. 
 

बातम्या आणखी आहेत...