आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कचराकोंडी माय फूट' शिवसेना समांतरच्या 'पाण्या'तच व्यग्र, शहरापेक्षा 'स्वारस्य' महत्त्वाचे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचराकोंडीच्या प्रश्नावर चर्चा करून पुढील मार्ग निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागपुरात बुधवारी (१७ जुलै) बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन यांनी थर्ड मारत बगल दिली. आम्ही मुंबई विमानतळावर अडकलो. पावसामुळे विमान लवकर निघाले नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

 

प्रत्यक्षात ही मंडळी तसेच खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठीच गेले होते. त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेचा ठेका मिळालेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या प्रतिनिधींना गाठून योजना कशी सुरू करता येईल, याविषयी वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, यावर बोलण्यास सर्वांनीच नकार दिला. वैद्य यांनी स्वत:हून ठाकरे यांनी सत्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. नागपूरला न जाऊ शकल्याने आम्ही मातोश्रीवर गेलो आणि तेथे सभापती झाल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

औरंगाबाद मुक्कामी असताना शनिवारीच बागडे यांनी महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना बुधवारच्या बैठकीची माहिती दिली होती. १५ लाख औरंगाबादकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रश्नावर ही बैठक आहे. त्यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कचराकोंडीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले होते. तेव्हाच आम्ही सर्व जण येणार असल्याचे महापौरांसह सर्वांनी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी तसे जाहीरही करण्यात आले. बुधवारी सकाळी सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. परंतु ते नागपूरकडे गेलेच नाहीत. पावसामुळे नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्याने जाऊ शकलो नाहीत, असा दावा त्यांनी केला.

 

आधीच ठरली होती मुंबईतील बैठक, ठेकेदाराला गाठून वाटाघाटी सुरू केल्याची चर्चा
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा बैठक ठरवली नेमकी तेव्हाच 'मातोश्री'वरील बैठक निश्चित झाली होती. खैरे, डॉ. सावंत, घोडेले, वैद्य, जैन यांना बैठकीला हजर राहण्याचे फर्मान जारी करण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की, येत्या महिनाभरात समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्याविषयी निर्णय होणार आहे. त्यात मोठी उलाढाल असल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यात अधिक स्वारस्य होते. पण तसे जाहीर केले असते तर भाजपने आक्षेप घेतला असता. नागरिकांनीही टीका केली असती म्हणून त्यांनी आम्ही नागपूरला जातोय, असा बनाव केला खरा. परंतु शनिवारपासूनच त्यांची तयारी मुंबईच्या बैठकीचीच होती. मुंबईत औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे प्रतिनिधी आधीच पोहोचले होते. कंपनीच्या प्रस्तावावर २४ जुलैला काय निर्णय घ्यायचा यावर त्यांच्याशी चर्चात्मक वाटाघाटी झाल्या. याविषयी थेट विचारणा केली असता महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी काहीही बोलू शकणार नाही, असे सांगितले.

 

सर्व विमाने वेळेवर :
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या विमानाला विलंब झाल्याने आम्ही बैठकीला पोहोचू शकलो नाही. त्यामुळे मुंबईत थांबलो, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना केला. परंतु 'दिव्य मराठी'ने सकाळी मुंबईहून नागपूरकडे जाणारे कोणते विमान विलंबाने गेले, याचा शोध घेतला असता दुपारी १२ वाजेपर्यंतची सर्व विमाने वेळेवर होती. एकही विमान विलंबाने गेले नाही की रद्द झाले नसल्याचे स्पष्ट झाले. नागपूरला जाऊन कचऱ्यावर चर्चा करण्यात काहीही 'अर्थ' नसल्याने त्यांच्या नेत्यांनी मंगळवारी दुपारीच असा निर्णय घेतला होता, असेही सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले.

 

नागपूरलाच जायचे होते!
आम्हाला नागपूरलाच जायचे होते. परंतु ऐनवेळी विमानाला उशीर झाला. त्यामुळे आम्ही 'मातोश्री'वर वेळ घेऊन पक्षप्रमुखांची भेट घेतली. मुंबईत कोणतीही बैठक नव्हती. - नंदकुमार घोडेले, महापौर.

 

'ते' काहीच बोलत नव्हते :
नागपूरला कसे जायचे, असा प्रश्न मी शनिवारी महापौर तसेच स्थायी समितीच्या सभापतींना केला होता. परंतु ते काहीच बोलले नाहीत. सोमवारी मी मोटारीने नागपूरला निघालो तेव्हाही विचारणा केली. परंतु त्यांना यायचे नव्हतेच. बुधवारी सकाळी त्यांनी विमानतळावर अडकलो, असे उत्तर दिले. प्रत्यक्षात ते थेट मातोश्रीवर पोहोचले होते. रीतसर निमंत्रण दिल्यावर बैठकीला दांडी मारून त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा आणि १५ लाख औरंगाबादकरांचा अवमान केला आहे. शिवसेनेला कचराकोंडी सोडवायची नाही. त्यांचा फक्त सोयीच्या ठिकाणी इंटरेस्ट दिसतोय, अशी कठोर टीका उपमहापौर विजय औताडे यांनी केली.


प्रखर विरोध, तरी मनपाने पडेगावात टाकला कचरा...
सलग दुसऱ्या दिवशी पडेगाव येथे कचरा टाकण्यास विरोध झाला. मंगळवारी दगडफेक झाली होती. बुधवारी पुन्हा विरोध झाला, परंतु शांततेत. तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने दोन तास थांबून नंतर येथे कचरा टाकण्यात आला.

   

बातम्या आणखी आहेत...