आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकोंडी फोडण्याचे पहिले पाऊल 8 ऑगस्टला, प्रत्येक कामासाठी 3 निविदा आल्या तरच काम सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - शहरातील कचराकोंडीवर नागपूर येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना चांगलेच सुनावले. प्रत्यक्ष काम कधी व कसे होणार याची माहिती विचारल्यानंतर डॉ. निपुण यांनी कचरा प्रक्रियेचा रोडमॅप फडणवीस यांना देऊन येत्या आठ ऑगस्टपासून कचराकोंडी फोडण्यास प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. यासाठी मनपाने पाच कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून, प्रत्येक कामासाठी तीन ठेकेदार किंवा संस्था समोर आल्या तरच ८ ऑगस्टपासून काम सुरू होणार आहे.      


गेल्या पाच महिन्यांच्या काळात शहरातील कचरा ठिकठिकाणी पुरणे, डंप करून ठेवणे यापलीकडे मनपाने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले असून, पावसामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. माशांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मनपाच्या निविदा प्रक्रियांना हवा तसा प्रतिसाद 

मिळत नसल्याने कचरा प्रक्रियेचे काम सुरू झाले नाही. दुसरीकडे कचराकोंडी फोडण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी शासनाने ८९ कोटी रुपये देऊनही काम सुरू न झाल्याने शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली. जूनच्या अखेरीस मनपा प्रशासनाने एकाच आठवड्यात पाच प्रकारच्या निविदा काढल्या. पहिली निविदा सिव्हिल वर्कची आहे. यासाठी तीन निविदा आल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यामुळे पुढील आठवड्यात हे काम सुरू होऊ शकेल. मात्र, उर्वरित चार निविदा प्रक्रियेत प्रत्येकी तीन निविदा आल्यानंतरच पुढील महिन्यात काम सुुरू होण्याची शक्यता आहे.

 

असा आहे निविदांचा कार्यकाळ
सिव्हिल कन्स्ट्रक्शन : निविदा भरण्याची तारीख १७ जुलै, तर उघडण्याची १९ जुलै होती. यात तीन निविदा आल्याने शनिवारी तांत्रिक तपासणी करण्यात आली.
कचरा संकलन आणि वाहतूक : निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै, तर उघडण्याची २६ जुलै आहे. यातही तीन निविदा आल्या तर सात ऑगस्टपासून काम सुरू होऊ शकते.

 

केंद्रीय प्रक्रिया : पडेगाव आणि चिकलठाणा येथे. निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै आणि उघडण्याची २७ जुलै आहे. यातही तीन निविदांची अट आहे.
यंत्र खरेदी व प्रक्रिया करणे : विकेंद्रित निविदा भरण्याची अंतिम तारीख ३० जुलै, तर उघडण्याची तीन ऑगस्ट आहे. तीन निविदा अाल्यानंतर आठ ऑगस्टपासून प्रत्यक्ष काम सुुरू होईल.

 

हर्सूल येथे ओपन तंत्रज्ञानाची यंत्रणा : निविदा भरण्याची अंतिम तारीख सहा ऑगस्ट असून तिसऱ्या आठवड्यात काम सुरू होईल.

 

कांचनवाडीत गॅस प्रकल्प : निविदा भरण्याची अंतिम तारीख ३० जुलै असून सप्टेंबरमध्ये निविदा उघडून महिन्याच्या शेवटी काम सुरू होईल.

 

आधी न्यायालय, आता मुख्यमंत्री
एप्रिल महिन्यात मनपाने तीन महिन्यांत कचरा कोंडी फोडण्यात येईल, असा सविस्तर अहवाल न्यायालयात दिला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आश्वासन देऊन मनपाने एका दिवसासाठी कोंडी फोडल्याचे चित्र निर्माण केले होते. यातील एकही काम अद्याप सुरू झाले नाही. आता मुख्यमंत्र्यांना रोडमॅप तयार करून देण्यात आला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...