आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकोंडी: शहराभोवती कचरा टाकण्याचा मनपाचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मिटमिटा, हर्सूल तलाव, कांचनवाडी, जांभाळा, हनुमान टेकडी या पाच ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. यापैकी चार ठिकाणांहून नागरिकांनी वाहनांना पिटाळून लावले. कांचनवाडीत कचरा गाड्यांसह बसवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर बळाचा वापर करत येथे कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यात आल्या. 


गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबादची कचराकोंडी झाली आहे. नारेगाव-मांडकीच्या आंदोलकांचे अनुकरण करत आता शहराभोवतीच्या सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी विनाप्रक्रियेचा कचरा स्वीकारण्यास जोरदार विरोध सुरू केला आहे. होळीच्या दिवशी कचरा प्रश्न चांगलाच पेटला. शहराभोवती विविध ठिकाणी कचरा टाकण्याचा महापालिकेचा प्रयत्न नागरिकांनी गाड्या अडवून हाणून पाडला. कांचनवाडीत गाड्या अडवून दगडफेक केली. तेथे पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 


नवेली देशमुख करणार सफाई
शनिवारपासून मिस इंडिया रनर अप नवेली देशमुख आणि एनएसएसची मुले शहरात स्वच्छता अभियान राबवणार आहेत. तसेच नारेगाव येथील आंदोलकांची भेट घेतील. शनिवारी सकाळी १० वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात होईल, अशी माहिती नवेलीच्या आईने दिली. नवेली ही एनएसएसची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. 


हर्सूलमध्ये चार ट्रक खाली केले 
दुपारी १२ वाजता मनपाने चार ट्रक कचरा हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन आणि आमराईत खड्डे करून पुरला. त्यानंतर पुन्हा कचऱ्याच्या गाड्या तलाव परिसरात आल्याची माहिती नागरिकांना समजताच सुरेश फसाटे, सोनाजी गायकवाड, नागेश थोरात, अक्षय पाथ्रीकर यांनी उर्वरित गाड्या येथे आणण्यास मज्जाव केला. पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी नागरिकांची समजूत काढली. पोलिसांचे वाहन येथे दिवसभर उभे होते. 


नारेगावकरांसोबत अाज पुन्हा चर्चा करणार 
क चऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सकाळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नारेगावच्या आंदोलकांसाेबत केलेली चर्चा निष्फळ ठरली. आंदोलकांनी आम्हाला उद्या दुपारपर्यंत वेळ द्या, आम्ही गावातील लोकांसोबत विचारविनिमय करतो असे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २.३० वाजता बैठक होणार आहे. आम्हाला उशिरा निरोप मिळाला, गावकऱ्यांसोबत आणखी चर्चा करायची असल्यामुळे आज कोणतीही चर्चा करता येणार नाही, आंदोलकांनी सांगितले. मिटमिट्याचे नगरसेवक रावसाहेब आमले आणि ग्रामस्थ शिवाजी गायकवाड, गणेश राऊत यांच्यासोबत आयुक्तांनी चर्चा केली. लोकांचा विरोध का आहे याची माहिती जाणून घेण्यात आली. त्यावर आमले यांनी या भागात पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. तसेच आजूबाजूला विहिरी आहेत. या भागात कचरा टाकल्यास पाणीसाठे दूषित होतील, अशी भीती ग्रामस्थांना वाटत असल्याचे सांगितले. 


कांचनवाडीत बळाचा वापर 
कांचनवाडी येथील एसटीपी प्लँटच्या बाजूला असलेल्या १५ एकर खुल्या जागेत कचरा टाकण्यासाठी दुपारी तीन वाजता गाड्या वळवण्यात आल्या. मात्र, नागरिकांनी दगडफेक करत त्या अडवल्या. यात पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले. नागरिकांना समजावण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डी.एम. मुगळीकर व इतर अधिकारी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. विरोध करणाऱ्या ५० महिला आणि नागरिकांना सातारा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कांचनवाडीत कचऱ्याच्या गाड्या खाली केल्या. 


स्थायी समितीतही कचऱ्यावर रणकंदन 
श हरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. उच्च न्यायालयाने नेमके काय आदेश दिले, प्रशासनाने आतापर्यंत काय केले, असा सवाल नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी उत्तर देऊन हा प्रश्न निकाली काढला. बैठकीत सुरुवातीलाच नगरसेवक राजू वैद्य यांनी कचऱ्याचा प्रश्न नेमका आताच का चिघळला, याचा सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी केली. शहराचे नाव देशात बदनाम झाले असून नगरसेवकांचीही बदनामी होत आहे. यावर पानझडे म्हणाले की, प्रशासन संवेदनशील असून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नारेगाव येथे कचरा टाकायला मान्यता मिळाल्यास हा प्रश्न निकाली निघेल. 


मिटमिट्यात गाडीतच जाळला कचरा 
मिटमिट्यातील ग्रामस्थ सकाळी आठ वाजताच फौजी हॉटेलजवळ येऊन थांबले. चालक मिलिंद घाटे एमएच २० ए ३७७४ या क्रमांकाच्या ट्रकमधून कचरा घेऊन हॉटेलजवळ आले. रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावून जमावाने गाडी अडवली. त्यानंतर गाडीचे नुकसान करत कचरा पेटवून दिला. चालक घाटे व काही नागरिकांनी जवळच्या हॉटेलमधून पाण्याचा पाइप घेऊन आग विझवली. चालकाने गाडी छावणी पोलिस ठाण्यात आणून लावली. 


महानगरपालिका बरखास्त करा : एमआयएम 
श हराच्या कचराकोंडीला गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता भोगणारे जबाबदार असून, आता आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान व गटनेते नासेर सिद्दिकी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली. खान म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात हजारो टन कचरा पडून आहे. दुर्गंधीमुळे जुन्या शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यावर तोडगा काढता आलेला नाही. आयुक्तही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले अाहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने मनपा बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सिद्दिकी यांनीदेखील सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. कचराकोंडी फोडण्यासाठी आमदारांसोबत आंदोलनकर्त्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
हनुमान टेकडी परिसरातून पिटाळल्या १५ गाड्या 
बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी आणि हनुमान टेकडीमागे कचरा टाकण्यासाठी मनपा आयुक्त दीपक मुगळीकर सकाळी साडेदहा वाजता कचऱ्याच्या १५ गाड्या पोलिस बंदोबस्तात घेऊन आले. याची माहिती मिळताच अनिल भिंगारे, योगेश पवार, अरुण शेळके, ज्ञानेश्वर कोकणे, रामनाथ शेळके, कचरू शेळके, प्रतिभा जगताप, संदीप थोरात आदी नागरिकांनी धाव घेत या गाड्या अडवल्या. ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांच्या परिसरात कचरा टाकण्यास विरोध केला. नागरिकांचा विरोध पाहून आयुक्तांनी माघार घेत या कचऱ्याच्या गाड्या परत पाठवून दिल्या. 


जांभाळ्याहून परतवून लावले 
सकाळी मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या जांभाळा गावातील गट नंबर १३० परिसरात पोहोचल्या. येथे कचऱ्याचे चार ट्रक खाली करण्यात आले. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तत्काळ रिकाम्या केलेल्या गाड्या परत भरायला लावल्या. भरलेल्या गाड्यांना रिकाम्या करण्यास हरकत घेत सर्व गाड्या पिटाळून लावल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन विनापरवानगी कचरा टाकण्यात आल्याने मनपावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी अशोक आस्वार, सुधाकर दाणे, बिलाल शेख, आकाश मोकळे, नारायण ढगे, शंकर गेलोत, भास्कर दाणे, संतोष बारगळ, विशाल पुसे, अंकुश नेलोत, किरण सुडा, पी. आर. राठोड, बळीराम गेलोत उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...