आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी महापौरांनी कान पकडून माफी मागितली, मग म्हणाले, आठ दिवसांत सावित्रीबाईंच्या पुतळ्याचे काम मार्गी लावू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या सोहळ्यात बुधवारी (११ एप्रिल) मंचावरून महापौर नंदकुमार घोडेले यांनी आधी कान पकडून माफी मागितली आणि नंतर भाषणात आठ दिवसांत सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारणीचे काम मार्गी लावू, असे सांगितले. 

 

औरंगपुरा येथे सकाळी हा सोहळा झाला. त्यात समितीचे अध्यक्ष मनोज घोडके यांनी प्रास्ताविकात सावित्रीबाईंचा पुतळा वारंवार पाठपुरावा करूनही उभा का होत नाही, अशी विचारणा केली. तेव्हा मंचासमोर कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित असलेल्या आणि या कामाकरिता सातत्याने महापौरांकडे मागणी करणाऱ्या संगीता पवार यांच्याकडे पाहत महापौरांनी स्वत:चे कान तीन-चार वेळा पकडत माफी मागितली. त्यानंतर भाषणात ते म्हणाले की, माझी पत्नी महापौर असताना तिने औरंगपुऱ्यात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात येऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने बैठका होत आहेत. आठ दिवसांत काम मार्गी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुतळा अनावरणासाठी निमंत्रित केले जाईल. तो शहरातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल. आमदार अतुल सावे यांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा करण्यात आम्हीही कमी पडलो, असे कबूल केले. सावित्रीबाई, जोतीरावांनी दिलेला शिक्षणाचा संदेश सर्वांनी अंगीकारावा, असे आवाहन केले. 


या वेळी नगरसेविका कीर्ती शिंदे, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, वॉर्ड सभापती आशा निकाळजे, नगरसेवक दिलीप थोरात, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक अनिल मकरिये, रामभाऊ पेरकर, माजी सभापती रतनकुमार पंडागळे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन हिवाळे, फकीरराव राऊत, प्रा. सुदाम चिंचाणे, प्रा. प्रभाकर गायकवाड, सिनेट सदस्य प्रा. भारत खैरनार, ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, 'दिव्य मराठी'चे सिटी इंचार्ज श्रीकांत सराफ आदींना महात्मा फुले सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गेल्या आठवड्यात माणिक हॉस्पिटल येथील आग प्रकरणात रुग्णांना वाचवण्यात पुढाकार घेणारे सलमान पटेल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी समितीचे गणेश काळे, विलास ढंगारे, विजय महाजन, संदीप घोडके, गजानन सोनवणे, चंद्रकांत पेहरकर, निशांत पवार, प्रा. बळीराम गादगे, सुभाष चव्हाण, संजीवनी घोडके, सरस्वती हरकळ, सुभद्रा जाधव, मंजूषा महाजन, जावेद खान, गणेश अंबेकर, चंद्रकलाताई पाथरे, सुनंदा कुथळे, किशोर माळी, योगेश हेकाडे, संजय माळी आदींनी सहकार्य केले. 
 

बातम्या आणखी आहेत...