आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांनी संसदेचे कामकाज चालवू दिले नाही म्हणून मोदी करणार असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुढे ढकलली मनपाची सभा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विरोधकांनी लोकसभेचे कामकाज चालवू दिले नाही, त्यामुळे आत्मक्लेश म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी एकदिवसीय उपोषण करणार आहेत. वेळ वाया गेल्याने हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपकडून देशभर उपोषण केले जाणार आहे. पण, इकडे औरंगाबादेत मोदींच्या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या उपोषणासाठी गुरुवारी होणारी मनपा सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही म्हणून त्यांचा नेता करत असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या सभेचे कामकाजच पुढे ढकलले. 

 

गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाची मासिक सर्वसाधारण सभा होणार होती. ही बैठक पूर्वनियोजित होती. मध्येच मोदींचे उपोषण आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी शहरात उपोषणही याच दिवशी ठरले. त्यामुळे उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, माजी महापौर भगवान घडमोडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन आमचे उपोषण असून त्यासाठी ही सभा पुढे ढकलावी, अशी विनंती केली. मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ही विनंती मान्य करत घोडेले यांनी गुरुवारची बैठक पुढे ढकलली. म्हणजेच आता कामकाज झाले नाही म्हणून उपोषण करणाऱ्या नेत्याला कामकाज पुढे ढकलून पाठिंबा दिला जाणार आहे. सकाळी गुलमंडी येथे होणाऱ्या उपोषणात विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सहभागी होणार आहेत. दानवेंसह प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होतील. 


एका सभेने काय फरक पडणार? 
कामकाज पुढे ढकलून उपोषणाला पाठिंबा कसा काय, असा प्रश्न शहराध्यक्ष तनवाणी यांना केला असता, ही मासिक बैठक होती, त्यात विशेष मुद्दे नव्हते. तसेच शिवसेनेचे महापौर घोडेले यांनी अवघ्या सहा महिन्यांत अनेक वेळा सभा पुढे ढकलल्या आहेत. त्यात आणखी एक सभा दोन दिवस पुढे ढकलल्याने काय फरक पडणार, असा सवाल त्यांनी केला. 
 

बातम्या आणखी आहेत...