आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने ९० दिवसांच्या मुदतीपैकी ६५ व्या दिवशी डीपीआर बदलला; आता देणार एकत्रित कंत्राट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचरा कोंडी ९० दिवसांत फोडू असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शपथेवर सांगून तसा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करणाऱ्या मनपाने न्यायालयात ४ एप्रिल रोजी म्हणजेच ९० दिवसांच्या मुदतीपैकी ६५ दिवशी हा डीपीआरच बदलला असून जुन्या डीपीआरनुसार २७ कचरा प्रक्रिया यंत्रे खरेदी करण्याऐवजी यंत्रे, प्रक्रिया आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकत्रित निविदा काढण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. ऐनपावसाळ्यात तीन हजार टन कचरा रस्त्यावर पडून असताना हा निर्णय घेण्यात आल्यामुळे शहराची कचराकोंडी पावसाळाभर तरी सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 


शासनाने डीपीआरनुसार मनपाला निधी करून दिला. दुसरीकडे शासन व न्यायालयात मनपाने वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार चार जुलैपर्यंत कचरा कोंडी फुटून प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात २५ टक्के विकेंद्रीकरण व ७५ टक्के केंद्रीकरण पद्धतीने काम करण्याचे ठरले होते. त्यासाठी मनपाने मशीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचेही नियोजन केले होते. मात्र आयुक्तांनी तत्कालीन परिस्थितीत घेतलेला हा निर्णयच बदलला आहे. आता ठेकेदाराला काम देण्यासाठी सात दिवस मुदतीची निविदा काढण्यात येणार आहे. चार केंद्रावर प्रक्रियेसाठीही निविदा काढली जाईल. 

 

आयुक्तांनी का घेतला निर्णय
यंत्रे खरेदी केल्यास ती चालवेल कोण? मनपाकडे मनुष्यबळ नाही. दुरुस्तीची सोय नाही. यंत्रे चालवण्यासाठी पुन्हा ठेकेदार नेमण्यापेक्षा थेट ठेकेदारालाच मशीन खरेदीसह प्रक्रिया करण्याचे काम दिल्यास मनपाला त्रास होणार नाही. थोडा विलंब होईल पण काम कायमस्वरूपी होऊ शकते. 


दुर्गंधीने कर्मचाऱ्यांना मळमळ 
दोनच पावसामुळे सडलेला कचरा उचलावा लागत असल्यामुळे घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता आमेर खान यांना सकाळी सेंट्रल नाक्याजवळ मळमळ झाल्याने त्यांना घाटीत हलवले होते. त्यामुळे मनपाने तातडीने ४३ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यात तीन जणांना ताप, दोघांना अंग दुखी असल्याचे आढळले. 


महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलली सोयीनुुसार भूमिका... 
४ एप्रिल २०१७ 

- २७ यंत्रे खरेदीमुळे प्रत्येक प्रभागातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तेथेच प्रकिया होईल. त्यामुळे कचरा कोंडी लगेच फुटेल. 
- निविदा प्रकिया तातडीने राबवण्यात येणार 
- वॉर्डातील कचरा प्रभागातच संपून जाईल. 
- कचरा कमी होण्यासह कायमस्वरूपी व्यवस्था करता येईल. 


७ जून २०१७ 
- आयुक्तांना वाटते की एकाच ठेकेदाराला सर्व कामे दिल्यास कचरा कोंडी फोडण्याचे काम अधिक चांगले होऊ शकते. 
- २७ यंत्रे खरेदीऐवजी एकच ठेकेदार नियुक्त केल्यास कायमस्वरूपी समस्या मार्गी लागेल. 
- चार प्रक्रिया केंद्रावर वेगळे काम करण्यात येणारच आहे. 


कचऱ्यामुळे साथ रोगाचे संकट 
गेल्या तीन दिवसांपासून कचरा वर्गीकरण आणि संकलन ठप्प झाले आहे. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी कचरा टाकण्यास विरोध होत असल्यामुळे रस्त्यावर सध्या दोन हजार टन कचरा पडून असल्याचा मनपाचा आकडा आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त म्हणजे तीन हजार टनपेक्षा जास्त कचरा पडून आहे. दोन पाऊस झालेे, पुन्हा पाऊस आल्यास मोठ्या प्रमाणात साथरोगाचा धोका आहे. 


शहरात महामारीचा धोका, उपाययोजना काय केल्या ते सांगा - आरोग्य विभागाची नोटीस 
साडेतीन महिन्यांपासूनच्या कचराकोंडीने आता भयानक रूप धारण केले आहे. उन्हाळ्यात कचराकोंडीचा धोका जाणवला नाही. मात्र, आता पावसाळ्यात कचराकोंडीने भयानक रूप धारण केले आहे. मान्सूनपूर्व शहरात पडलेल्या पावसामुळे कचऱ्याची अति गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यावर सडत असलेल्या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून अळ्या निघत आहे. त्यामुळे शहरात महामारी पसरण्याचा धोका निर्माण झाला असून त्यासंदर्भात मनपा काय उपाय योजना करीत आहे. अशी नोटीस राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने औरंगाबाद महापालिकेला बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...