आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त आयुक्तांनी काढल्या ४० कोटींच्या फायली निकाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १६ मार्चपासून विकास कामांच्या अर्थात अंदाजपत्रकांच्या संचिका तुंबल्या होत्या. आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. निपुण विनायक यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे अधिकार प्रदान केले. मात्र तेही दीर्घ रजेवर गेले. त्यामुळे पुन्हा संचिका तुंबल्या. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांचा पदभार कार्यकारी अभियंता डॉ. दीपक कुलकर्णी यांच्याकडे सोपवल्यानंतर आठ दिवसांत त्यांनी ४० कोटींची अंदाजपत्रके मंजूर केली आहेत. 


तुंबलेल्या संचिका मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची नियुक्ती केली होती. मात्र, सिडको एन-६ येथील प्रकरणानंतर ते दीर्घ सुटीवर गेल्याने अडचण झाली. आठ दिवस भालसिंग यांच्या परतण्याची वाट पाहण्यात आली. नंतर २८ जूनला आयुक्तांनी कार्यकारी अभियंता डी.पी. कुलकर्णी यांची पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यानुसार आता तुंबलेल्या दीड हजारापेक्षा अधिक संचिकांमधून एकेक संचिका मार्गी लागत आहे. आठ दिवसांत चारशे पेक्षा अधिक संचिका मार्गी लागल्या आहेत. सुमारे ४० कोटींची विविध विकासकामांची अंदाजपत्रके कुलकर्णी यांनी निकाली काढल्याचे महापौर नंदकुमार घोडेले पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


आता निकाली निघालेली अंदाजपत्रके टप्प्याटप्प्याने मंजुरीसाठी स्थायी समितीकडे येतील. स्थायीच्या मंजुरीनंतर त्यांची निविदा प्रक्रिया, वर्कऑर्डर होईल. मागील तीन वर्षांत वॉर्डात विकासकामे झालेली नाहीत. पालिका तिजोरीत खडखडाट असल्याने वॉर्डातील पाच-दहा लाखांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेलाही कंत्राटदारांकडून शून्य प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी सहा किंवा वर्षभर मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल की नाही यात शंका आहे. 

बातम्या आणखी आहेत...