आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा, पडेगावात पोलिस बंदोबस्तात कचरा टाकणे सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पडेगाव आणि चिकलठाणा येथे कचरा टाकण्यास विरोध होत असल्याने गेल्या सात दिवसांपासून शहरातील कचराच उचलण्यात आला नाही. परंतु मंगळवारपासून महापालिकेने पोलिस बंदोबस्तात दोन्हीही ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली. पडेगावात जमावाने महापालिकेच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांची कुमक जास्त असल्याने नागरिकांचा विरोध अयशस्वी झाला. त्यामुळे दिवसभरात मिळून दोन हजार टन कचरा शहरातून उचलून नेण्यात आला. असेच राहिले तर शहरातील २० हजार टन कचरा ८ दिवसांत उचलला जाईल, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. 


शहरातील कचराकोंडीला पाच महिने सोमवारीच पूर्ण झाले आहेत. आजघडीला रस्त्यावर हजारो टन कचरा पडून आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, माशांचा त्रास वाढल्यामुळे रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कंट्रोल रूम तयार केल्यानंतर आता कचरा उचलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 


सोमवारी रात्रीच गाड्या सज्ज
सोमवारी रात्रीच कचऱ्याच्या मोटारी भरून तयार होत्या. मंगळवारपासून कचरा या दोन्ही ठिकाणी टाकण्याचे नक्की करण्यात आले होते. पहाटे चार वाजेपासून पडेगाव व चिकलठाणा येथे या गाड्या पाठवण्यात आल्या. पडेगाव येथे सकाळी विरोध झाल्याने पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला; मात्र पोलिस येताच विरोध करणाऱ्यांनी पलायन केले. 


दगडफेकीमुळे खळबळ 
मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्सारी कॉलनी येथील तरुणांनी कचऱ्याने भरलेल्या ट्रकवर दगडफेक केली. त्यामुळे खळबळ उडाली. पुन्हा मोठा फौजफाटा घेऊन बंदोबस्तातच कचरा या ठिकाणी टाकण्यात आला. पहिल्याच खेपेत २०० टन कचरा नेण्यात आला. त्यानंतर दिवसभरात हा आकडा दोन हजार टनांपर्यंत पोहोचला. 

 

आज नागपुरात बैठक 
पाच महिन्यांनंतरही शहरातील कचरा प्रश्न कायम असल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला. बुधवारी नागपूर येथे बैठक बोलावल्याची माहिती उपमहापौर विजय औताडे यांनी दिली. सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, या पार्श्वभूूमीवर बागडे यांनी ही बैठक बोलावली. महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 


वर्गीकरण व प्रक्रिया

या दोन्हीही ठिकाणी फक्त कचरा नेऊन टाकण्यात येणार नाही. येते कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तर सुका कचरा अन्यत्र नेला जाईल. त्यामुळे येथून दुर्गंधी येणार नाही, असे महापौर घोडेले म्हणाले. 


...पुन्हा नारेगावचा पर्याय! 
मनपाने काढलेल्या निविदांत नारेगाव डेपो विकासाचीही निविदा आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत नारेगाव येथे कचरा टाकण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून परवानगी मागितली जाऊ शकते. त्यासाठी काही मनपा पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. अर्थात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकरांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. नारेगावचा निर्णय घ्यायचा झाल्यास समितीला आपला निर्णय फिरवावा लागेल. तसे होऊ शकते का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...