आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यास लागणार चार दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात तीन दिवसांआडऐवजी दोन दिवसांआड तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी काढले. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडे याबाबतचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी किमान चार दिवस तरी लागणार आहेत. 


पाणीपुरवठ्याची बिघडलेली घडी सुधारून शहरवासीयांना दोन दिवसांआड पाणी देण्याच्या सूचना यापूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्या होत्या. मात्र, पाणीपुरवठा विभागाने त्याची अंमलबजावणी केली नाही. दोन दिवसांपूूर्वी स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनीही आयुक्तांकडे अशी सूचना केली होती. आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचा अभ्यास करून आठवडाभरात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आधी शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी दोनऐवजी तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार १५ मेपासून अद्याप तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यानंतरही काही भागांत सात ते आठ दिवसांआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे लेखी आदेश बजावले. आपल्याकडे या पद्धतीने काम करण्याचे कोणतेही नियोजन नाही, हे माहीत असूनही आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांचीही दिशाभूल केल्यामुळे हे आदेश निर्गमित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


कारभार 'जैसे थे'च 
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेऊन सरताजसिंग चहल यांच्याकडे असलेला पाणीपुरवठ्याचा पदभार कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर कोल्हे यांनी पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. त्यांच्या दिमतीला उपअभियंता, कनिष्ठ अभियंता देण्यात आले. मात्र, अद्यापही नियोजन नाही. 


नगरसेवकांकडून स्वागत 
स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात होताच सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आदेश आयुक्तांनी काढल्याची माहिती देताच नगरसेवकांनी स्वागत केले. 


या भागात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब 
सिडको-हडको, क्रांती चौक, जुना शहराचा भाग, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, भीमनगर-भावसिंगपुरा, शिवाजीनगर या भागासह शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नगरसेवक सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. 


टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी 
'दोन दिवसांआड पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ण शहरात तो लागू होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा करणार आहे. यासाठी अजून चार दिवसांचा कालावधी लागणार आहे.
- राजू वैद्य, स्थायी समिती सभापती 


नागरिकांना दिलासा मिळेल 
'शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्यासाठी सुरुवातीलाच आयुक्तांना आदेश दिले होते. तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्याचे आदेश काढण्यात आल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- नंदकुमार घोडेले, महापौर 

बातम्या आणखी आहेत...