आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशासनाचे अंदाजपत्रक 1276 कोटींचे, सभापतींनी आकडा नेला 1476 कोटींवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेला येणारा महसूल आणि अनिवार्य खर्च लक्षात घेता फक्त दीडशे कोटींची कामे होणार हे माहिती असतानाही प्रशासनाने १२७६ कोटींचे अंदाजपत्रक सादर करून आकडे फुगवले. त्यात आता स्थायी समितीने २०० कोटींची हवा भरली असून तिजोरी रिकामी असताना अंदाजपत्रकाचा आकडा १४७६ कोटींवर गेला आहे. आता महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे सर्वाधिकार असणार आहेत. अंदाजपत्रकाचा आकडा फुगवण्यात ते माहिर समजले जातात. त्यामुळे हे अंदाजपत्रक दोन हजार कोटींचा आकडा तर पार करणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर घोडेले यांनी यापूर्वीच ५० कोटींच्या कामांचे पत्र लेखा विभागाला दिले आहे. 


गतवर्षीचे सुधारित अंदाजपत्रक ७८७ कोटींचे
२०१६-१७ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक ७८७ कोटी रुपयांचे आहे. महापालिकेचा महसूल ५०० कोटींच्या आसपास आहे आणि अनिवार्य खर्च आहे साडेतीनशे कोटींचा. म्हणजे प्रत्यक्षात विकासकामे होतात फक्त दीडशे कोटींची. तरीही यंदा अंदाजपत्रक सादर करताना प्रशासनाने बाराशे कोटींच्या पुढे मजल मारली. 


अंदाजपत्रकात अशी केली वाढ 
नगरसेवकांच्या वाॅर्डातील कामे वाढवताना बारवाल यांनी महसुलाच्या उद्दिष्टांत वाढ केली. एलबीटी ३० कोटी, मालमत्ता कर ५० कोटी, नगररचना विभाग ३५ कोटी, शासकीय अनुदान ४० कोटी आणि पाणीपट्टीत २५ कोटींची वाढ केली. इतर वसुलीत आणखी २५ कोटी मिळतील, असेही अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. इतर वसुली म्हणजे काय हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. 


इतिहासात प्रथमच महापौर म्हणाले, ते शब्द कामकाजातून वगळू नका 
वर्ष २०१७-१८ वर्षाचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यासाठी आयोजित सभेत रविवारी शहर विकास आघाडीतून बाहेर पडलेल्या चार सदस्यांनी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. सदस्यांनी असे काही केले तर ते शब्द कामकाजातून वगळले जातात. येथे मात्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी ते शब्द कामकाजातून वगळू नयेत, असे आदेश दिले. तसेच त्या चार सदस्यांना एक दिवसासाठी निलंबित केले. कायद्याचा अभ्यास करून त्यांचे निलंबन वाढवता येते का, याची चाचपणी केली जाणार अाहे. उपायुक्तांकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे घोडेले यांनी स्पष्ट केले. 


स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची तीन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. या वेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही बंद पाकिटात पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली. त्यामुळे शहर विकास आघाडीत त्या दिवशी फूट पडली. या गटाच्या सदस्यांनी रविवारी विशेष बैठकीमध्ये सभापती बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला.

बातम्या आणखी आहेत...