आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात समाजकंटकांकडून दोन वर्षांनंतर पुन्हा ढोरकीनच्या झेडपी शाळेची नासधूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढोरकीन- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील औरंगाबाद पैठण महामार्गालगत असलेल्या ढोरकीन येथील समाज कल्याण वसाहतीजवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळेची उन्हाळ्याच्या सुट्यात शाळा बंद असल्यामुळे अज्ञात समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत सर्व वर्ग खोल्यांचे दरवाजे खिडक्या तोडून कपाटाचे दरवाजे तोडून कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त करत मोठी नासधूस केली आहे. या अगोदर घडलेल्या पूर्वीच्या घटनेला काहीसा विसर पडताच शाळेच्या तोडलेल्या खिडकी व दरवाजातून आत वर्ग खोल्यात प्रवेश करून विद्यार्थ्यांचे हजेरीपट, टाचण वह्या व इतर शालेय रेकाॅर्डबुक आदींचे समाजकंटकांनी सर्व लाकडी कपाटाच्या कुलुपे तोडून नुकसान केले आहे. तर शालेय महत्त्वाच्या वस्तुंचीही अस्ताव्यस्त फेकून देऊन मोडतोड केली आहे. तसेच शाळेच्या भिंतीवर अनेक ठिकाणी लज्जास्पद अश्लील वाक्ये लिहून ठेवले आहे. ही घटना काल गुरुवारी सकाळी शाळेच्या वर्गखोल्या उघडल्यावर शिक्षकांच्या नजरेस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


पैठण तालुक्यात ढोरकीन येथे औरंगाबाद पैठण मार्गालगत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. यात प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंतच्या व हायस्कूल पाचवी ते दहावीच्या वर्ग खोल्यांमध्ये मोठे अंतर आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत पाचवी ते दहावीपर्यंतच्या हायस्कूलच्या शाळेची अज्ञात समाजकंटकांनी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची, टेबल खुर्च्यांची, विज्ञान प्रयोग शाळेची, छतावरील पंख्यांची, वीज सामग्रीची, दरवाजे, खिडक्यांची, वरांड्यातील फरशांची, लाकडी खांबांची, शालेय क्रीडा साहित्यांची, लाकडी फर्निचर आदींची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करून नुकसान केले आहे. 


या वारंवार घडत असलेल्या घटनेमुळे पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आज शुक्रवारी ता.१५ जूनपासून जिल्हाभरातील सर्व खासगी व सरकारी शाळा सुरू होत आहे. 


दोन वर्षांपूर्वीही घडला होता प्रकार 
२०१६ साली देखील जूनमध्ये असेच तोडफोडीचे प्रकार घडले होते. यात अज्ञात समाजकंटकाने प्रयाेगशाळेची नासधूस, खोल्या व वऱ्हांड्याच्या फरशा उखडून टाकल्या होत्या. यात शाळेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिली. तसेच वर्गणी गोळा करून येथे सुरक्षारक्षक नेमला होता. परंतु दोन महिन्यांनी वेळेत वर्गणी होत नसल्याने सुरक्षारक्षक राहिला नाही. तर शाळा समिती, शिक्षक व स्वराज प्रतिष्ठान युवा मंडळाने पुढाकार घेत वर्गणी गोळा करून दरवाजा खिडक्यांची दुरुस्ती केली होती. 


नुकसानीचे प्रकार सुरूच.. 
या अगोदरही काही दिवसांपूर्वी शाळा नुकसानीची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांत माहिती दिली होती. पोलिसांनी रात्री गस्त वाढवली होती. काही दिवस नुकसानीचे प्रकार थांबले मात्र पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे. -रेणुका माळेवाडीकर, मुख्याध्यापिका, झेडपी शाळा ढोरकीन

 
गुन्हेगारावर कारवाई करणार 
आम्ही माहिती मिळताच शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. रात्री गस्त वाढवून गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र गुन्हेगार सापडला नाही. आमचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. गुन्हेगारावर कारवाई करू. 
- ज्ञानेश्वर पायघन, सपोनि, औद्योगिक वसाहत पैठण 


चर्चा करायला वेळ नाही 
या शाळेच्या वर्गखोल्यांच्या नासधुशीची माहिती या अगोदर जिल्हा परिषद सदस्या कुसुमबाई लोहकरे यांना दिली होती. परंतु त्यांनी या शाळेच्या वर्गखोल्यांच्या नासधुसीकडे हेतुपुरस्सर साफ दुर्लक्ष केल्यानेच अज्ञात माथेफिरूंची हिंमत वाढली असल्याचे पालकांतून बोलले जात आहे. दरम्यान शाळा वर्गखोल्या नुकसान करणाऱ्यांवर काय कारवाई करणार याविषयी विचारले असता त्यांनी या विषयावर चर्चा करायला माझ्याकडे अजिबातच वेळ नसल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...