आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी 70 टक्क्यांवर, टंचाई नाही... तरीही साडेपाच कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- चार वर्षांच्या भीषण दुष्काळानंतर यंदा पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुढील दोन-तीन वर्षे तरी तालुक्यात पाणीटंचाई होणार नाही, असा दावा प्रशासन करत होते.  तशी परिस्थिती असतानाही आता मात्र तालुक्यात टंचाईच्या सावटामुळे उपाययोजना व कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्याची धडपड सुरू झाली. जायकवाडी आजमितीस ७० टक्क्यांवर असून अद्याप टंचाईसदृश परिस्थितीचा मागमूस नाही तरीही प्रशासनाने टँकर लॉबी पोसण्याच्या हेतूने तालुक्यात पाणीटंचाई या वर्षी तरी संभाव्य नसताना केवळ टँकर लाॅबीसाठी प्रशासनाने ५ कोटी ६७ लाख ८८ हजारांचा कृती आराखडा तयार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.    


पैठण तालुक्यात दरवर्षी टँकरवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात.  तशी तयारी काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते. यासाठी यंदा तर कहरच केला असून  टंचाई नाही तरीही कोट्यवधीचा टंचाई  कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.  यंदाच्या पावसाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. 


शिवाय तालुक्यातील लहान-मोठे पाझर तलाव, बंधाऱ्यात सध्याही या उन्हात तहान भागेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. परिस्थिती अनुकूल असताना प्रशासनाने साडेपाच कोटींहून अधिक रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.  दरम्यान,  टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून सध्या तरी टँकर सुरू करण्यात आले नाहीत. मागणी येताच ते सुरू करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

 

पाणीपुरवठा योजना नाहीत   
पैठण तालुक्यात जायकवाडीसारखे मोठे धरण असताना मराठवाड्यातील सर्वात जास्त टँकर पैठण तालुक्यामध्ये सुरू असतात. यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. टँकर नसताना कागदावर टँकर दाखवले जातात. यात कार्यकर्ते पोसण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून परिणामी गावपातळी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवली गेली नाही.  

बातम्या आणखी आहेत...