आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांना नावे : अधिकारी म्हणाले, 'नाव' ठेवायला दुसरे कोण भेटणार?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जेथे खड्डा दिसेल त्याला अधिकाऱ्यांची नावे द्या, अशी सूचना केली. तेव्हा औरंगाबादेत करायचे काय, असा प्रश्न समोर येतो. महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शिंदेंची तळी उचलली नाही. ते म्हणाले, खड्ड्यांना कोण जबाबदार आहे ते सर्वश्रुत आहे.

 

ठाण्यातील अधिकारी शिंदेंचे ऐकत नसतील. त्यामुळे त्यांनी हा आदेश किंवा सूचना दिली असेल. आमचे अधिकारी आमच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे खड्ड्यांना अधिकाऱ्यांची नावे द्यावीत, असे मी म्हणणार नाही. दुसरीकडे हाच प्रश्न अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला असता 'नाव' ठेवण्यासाठी आमच्यासारखे सुरक्षित दुसरे कोण, तेव्हा ठेवू द्या आमची नावे, अशी भूमिका घेतली तर स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य म्हणाले, यापूर्वीचे माहिती नाही परंतु आता जी दर्जेदार कामे झाली आहेत, त्या रस्त्यावर आम्ही जागोजागी अधिकारी तसेच ठेकेदारांची नावे लिहून ठेवणार आहोत. तेव्हा खड्डा पडला की अधिकारी व ठेकेदारांची नावे ठेवली जावीत असे स्पष्ट केले.

 

ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते शिंदे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर औरंगाबादेत काय, असा प्रश्न समोर आला. महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यावर खापर न फोडता आपल्या नेत्याशी पंगा घेणे पसंद केले. ते म्हणाले, तेथील अधिकारी शिंदे यांचे ऐकत नसावे. त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केले. आमचे अधिकारी ऐकतात. आमच्याकडेच दर्जेदार रस्ते करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले तर अधिकाऱ्यांना का बरे बदनाम करावे, असा निरागस प्रश्न त्यांनी केला. स्थायी समितीचे सभापतिपद दुसऱ्यांदा सांभाळणारे राजू वैद्य यांच्या मते आम्ही आता रस्त्यांची कामे दर्जेदार करतोय. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी ठेकेदारांबरोबरच अधिकाऱ्याचेही नाव नमूद केले जाणार आहे. तेथे खड्डा पडला तर दोघांचीही नावे त्या खड्ड्याला दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

 

नेतेपदाचे राजकारण
घोडेलेंनी शिंदे यांची तळी न उचलण्यामागे नेतेपदाचे राजकारण असावे, असा कयास आहे. कारण खासदार चंद्रकांत खैरे हेदेखील आता सेनेचे नेते आहेत. त्यामुळे खैरेंपेक्षा घोडेलेंसाठी येथे कोणीही मोठे नाही. शिंदे काय म्हणतात त्यापेक्षा खैरे काय म्हणतात हे घोडेलेंसाठी महत्त्वाचे. दुसरीकडे वैद्य यांनी येथून पुढे असा शब्दप्रयोग करत यामागे काय झाले, त्याला आपण जबाबदार नाही, असे सूचित केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...