आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदीचा पहिल्याच दिवशी 'कचरा', मनपाला सायंकाळनंतर कारवाईसाठी जाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीचा महापालिकेने पहिल्याच दिवशी 'कचरा' केला. सोमवारपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणीची घोषणा करणाऱ्या महापालिकेचे पथक सोमवारी सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बसून राहिले. कारवाई करणाऱ्या पथकाकडे वाहनेच नसल्याचे कारवाई बंद असल्याचे कळल्यावर मोहीम प्रमुख नंदकिशोर भोंबेंवर बाहेर पडण्याची वेळ आली. मात्र, त्यांना बैठक असल्याने इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत दहा दुकानदारांकडून ३६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी नियमित कारवाई होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 


महापालिकेने सोमवारपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी मोहीम राबवणार असल्याचा मोठा गाजावाजा केला होता. त्यासाठी ४२ जणांची दहा पथकेही तयार केली. सोमवारी सकाळी नऊ वाजता आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत पथकाची बैठक होऊन दुपारी पथक कारवाई सुरू करणार होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयुक्तांच्या पथकाला सोडून अन्य बैठका चालू असल्याने दोन वाजेपर्यंत पथक नुसते बसून होते.


तीन दिवस सायंकाळी प्रत्येक वॉर्डात होणार प्लास्टिक संकलन 
बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तीन दिवसांत सकाळी कचरा संकलन करतात त्याचप्रमाणे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत केवळ प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी प्लास्टिक टाकून द्यावे किंवा संकलन केंद्रावर आणून टाकावे, आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. 


८५ किलो प्लास्टिक संकलन केंद्रांवर नागरिकांनी केले जमा 
नागरिकांनी प्लास्टिक आणून देण्यासाठी नऊ प्रभाग कार्यालयांत संकलन केंद्र सुरू केले होते. प्रभाग चार, सहा, सात आणि नऊ या प्रभागात याला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी तब्बल ८५ किलो प्लास्टिक जमा केले. पथकांच्या कारवाईपेक्षा जास्त प्लास्टिक संकलन केंद्रात गोळा झाले.

 
प्रभाग 'फ'मध्ये पहिली कारवाई
प्रभाग फमध्ये पथक प्रमुख म्हणून स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली. मात्र, नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभाग अधिकारी आहे. पथक बसून असल्याचे लक्षात आल्यावर प्रभाग अधिकारी महावीर पाटणी यांनी स्वत:च्या गाडीत पथकाला बसून वॉर्डात फेरफटका मारला. पुंडलिकनगर रोडवरील विकास फुटवेअरमध्ये तपासणी केली असता १३० कॅरीबॅग दिसून आल्या. त्यांना तत्काळ पाच हजार रुपयांचा दंड ठोठावत प्लास्टिक जप्त केले. शहरातील ही पहिली कारवाई होती. 


'औरंगाबाद कनेक्ट'ची २२ संकलन केंद्रे 
बंदी घातलेली प्लास्टिक उत्पादने कुठे टाकावीत किंवा जमा करावीत, या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शहरात गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय असलेली औरंगाबाद कनेक्ट ही संघटना पुढे आली असून शहराच्या जागोजागी २२ ठिकाणी बंदीची प्लास्टिक उत्पादने जमा करण्याची केंद्रे मंगळवारपासून सुरू होतील. गरजेनुसार केंद्रांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे कनेक्टचे सारंग टाकळकर यांनी सांगितले. 


कनेक्टच्या वतीने लवकरच नागरिकांना अल्प दरात कापडी पिशव्या शिवून दिल्या जाणार आहेत. इतरांच्या कपड्यांच्या पिशव्या नागरिक वापरत नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या केेंद्रांवरच कपडे शिवणारा टेलर अर्थात शिंपी उपलब्ध असेल. ते नागरिकांना घेऊन आलेल्या कपड्यांपासून अल्प दरात पिशव्या शिवून देईल. किती ठिकाणी टेलर उपलब्ध असतील, याची माहिती व त्यांचे क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे टाकळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...