आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतील 'ते' दृश्य बनावटच; फोटो काढणाऱ्यानेच दिली कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटी रुग्णालयात चिमुरडीच्या हाती सलाईनची बाटली देऊन तिचा स्टॅण्डसारखा वापर केल्याचे गुरुवारी बहुतांश माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त तद्दन खोटे असल्याचे आज ठळकपणे समोर आले आहे. 'दिव्य मराठी'ने सोशल मीडियावरील माहितीचे सत्य पडताळून पाहाण्याची दक्षता घेतल्याने कालच त्या संदर्भातली वस्तुस्थिती समोर आणली होती. त्यावर आज छायाचित्र घेणाऱ्यांकडून आणि त्या चिमुरडीकडूनही शिक्कामोर्तब झाले. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात, घाटीत एका चिमुरडीच्या हाती सलाईनची बाटली देऊन तिला स्टॅण्डसारखे उभे करवून ठेवल्याचे वृत्त छायाचित्रासह इलेक्ट्राॅनिक आणि बहुतांश मुद्रित माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियातूनच ते वृत्त 'दिव्य मराठी'कडेही आले हाेते. मात्र, ते तसेच्या तसे प्रसिद्ध करण्याऐवजी त्याची खात्री करवून घेण्याची दक्षता घेण्यात आली. त्यावेळी तसे काही घडलेच नसल्याचे समोर आले. तसे वृत्तही कालच दिव्य मराठीत प्रसिद्धही झाले आहे. मात्र, त्यामुळे विशिष्ट गटाकडून 'ट्रोलिंग'ही करण्यात आले. आज दिव्य मराठीने या वृत्ताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा गम्मत म्हणून हे छायाचित्र काढले होते आणि त्याचा असा उपयोग होईल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रीया संबंधितांनी नोंदवली. फोटो काढण्यासाठीच आपल्याला सलाईनची बाटली हातात धरायला सांगितली होती, असे संबंधित मुलीनेही स्पष्ट केले आहे. 


प्रसंग भावनिक करण्यासाठी 
दरम्यान, ज्यांनी धृपदाच्या हातात सलाईनची बाटली देऊन फोटो काढला होता त्यांनी एक व्हिजिटींग कार्डही तिच्याकडे दिले होते. त्यावरून त्यांच्याशी संपर्क साधला असता ग्लोबल फाऊंडेशनच्या मोहसीन खान यांनी वस्तुस्थिती सांगितली. ते म्हणाले की, ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही वैद्यकीय समाजसेवा करतो. त्या रात्री घाटीत गेलो तेव्हा एक चिमुरडी आपल्या बापाजवळ थांबून त्याची काळजी घेत असल्याचे दिसले. तो प्रसंग भावनिक करण्यासाठी आमच्यातीलच एकाने तिला सलाईनची बाटली हातात घेऊन उभे राहायला सांगितले.


काय म्हणते 'ती' मुलगी 
धृपदा गवळी असे त्या चिमुरडीचे नाव आहे. आॅपरेशन होऊन १९ क्रमांकाच्या वार्डात हलविण्यात आलेल्या आपल्या वडीलांच्या पलंगाजवळ ती उभी होती. त्याच वेळी तिथे काही तरूण आले. त्यातील एकाने तिला ती बाटली हातात धरून उंच करायला सांगितली. तिने तसे केले तेव्हा त्याने फोटो काढला आणि तेवढ्यात स्टॅण्ड घेऊन परिचारक आला. त्याने ती बाटली सॅण्डला अडकवली. ही माहिती धृपदानेच 'दिव्य मराठी'ला सांगितली. त्याचे ध्वनीचित्र मुद्रणही करण्यात आले आहे. 


या शिवाय, त्या वाॅर्डात गवळी यांच्या शेजारच्याच पलंगावर असलेल्या सय्यद वाहेद आणि तिथे त्या वेळी उपस्थित असलेल्या संजय कणसे यांच्याकडेही चाैकशी करण्यात आली. त्यांनीही धृपदा जे सांगते तेच खरे आहे, असे 'दिव्य मराठी'ला सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...