आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिल्लोड: ग्रा.पं.सदस्य महिलेचे पतीसह अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचावर दाखल अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्या वैशाली काकासाहेब जिवरग व त्यांचे पती काकासाहेब तुकाराम जिवरग यांचे सिल्लोड शहरातून अपहरण केल्याप्रकरणी वडगाव काल्हाटीचे सरपंच महेश हनुमान भोडवे व उपसरपंचाचा मुलगा राम वामन पाटोळे यांच्यासह सहा जणांवर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य वैशाली जिवरग यांचे दीर गजानन जिवरग (रा. टिळकनगर, सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तक्रारीत म्हटले  की, माझी वहिनी वैशाली काकासाहेब जिवरग वडगाव कोल्हाटीच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. बुधवारी (दि. २५) मला भेटण्यासाठी त्या टिळकनगर सिल्लोड येथे माझ्या घरी आल्या होत्या. त्यांना परत घेऊन जाण्यासाठी भाऊ काकासाहेब तुकाराम जिवरग हे शनिवारी (दि.२८)  आले. ते येथे आल्याने त्यांना भेटण्यासाठी वडगाव कोल्हाटीचे सरपंच महेश हनुमान भोडवे व उपसरपंचाचा मुलगा राम वामन पाटोळे, गिरणीवाला त्रिभुवन यांच्यासह अन्य तीन जण माझ्या घरी आले. सरपंच भोडवे व त्यांचे साथीदार माझा भाऊ काकासाहेब व वहिनी वैशाली यांना बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट वाहनातून (क्र. एम. एच. २० बी.एल.७७७५) घेउन गेले. 

 

त्यांना परत आणून सोडतील असे वाटले होते. परंतु, रविवार (दि.२९) पर्यंत भाऊ व वहिनीचा तपास लागला नसून त्यांचा मोबाइलही बंद आहे. वडगाव कोल्हाटीच्या सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल केल्याने सदर इसमांनी त्यांचे अपहरण करून बंदिस्त करून ठेवले आहे. संबंधितांना ताब्यात घेऊन भाऊ व वहिनीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सरपंच, उपसरपंचाचा मुलगा गिरणीवाला त्रिभुवन  यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...