आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोयाबीन, कांदा, टोमॅटो, तुरीचे वांधे; कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबेनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यानंतरही शेतकरी आत्महत्यांत चिंताजनक वाढ झाली आहे. कर्जमाफीतील दिरंगाई, सोयाबीनच्या किमतीत घट, गुलाबी  बोंडअळीमुळे हक्काचे कापूस पीक हातचे गेले. कांदा-टोमॅटोचे दर कोसळले, त्यातच अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा जानेवारी ते १९ एप्रिलअखेरपर्यंत राज्यात ६९६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. गतवर्षी याच काळात ६७२ आत्महत्यांची नोंद होती. विशेष म्हणजे, शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रात यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. यंदा आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १०१ शेतकरी आत्महत्यांची नोंद असून गतवर्षी याच काळात या भागात ८८ आत्महत्या झाल्या होत्या. 

 
सरकारने जून २०१७ मध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरू केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे तज्ज्ञांचे मत होते. मात्र, कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या अात्महत्यांत वाढ झालेली आहे. कर्जमाफी ते आतापर्यंत अनेक घटकांचा परिणाम शेतीवर झाला. कर्जाचा बोजा, कृषी उत्पादनाच्या किमतीतील घसरण, अवकाळी पाऊस, गारपीट, सरकारी खरेदीतील गोंधळ अशा विविध कारणांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केल्याचे सुसाइड नोट्सवरून समोर आले आहे.

 

> कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारणे...

कर्जमाफीतील दिरंगाई

कर्जमाफीच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ दिसून आला. त्यात कधी ऑनलाइन, कधी ऑफलाइन, यादीत घोळ, कधी आयटी विभागाचा गोंधळ असे अडथळे आले. त्यातून अस्वस्थता वाढली. 

 

सोयाबीन भाव गडगडले
नगदी पीक म्हणून भरवसा असलेल्या सोयाबीनने यंदा दगा दिला. सुरुवातीला ३००० रुपयांवर असणारा भाव कोसळून २५०० पर्यंत घसरला. त्यातच उत्पादकता घटली. त्याचा फटका अनेकांना बसला.

 

कापसावर गुलाबी संकट
मराठवाड्यासह विदर्भातील रोकड पीक असलेल्या कापसावर यंदा गुलाबी बोंड अळीने हल्ला केला. कापसाचा भाव उतरला, उत्पादन घटले. यामुळे शेतकऱ्याच्या हाती फारसे काही लागले नाही.

 

टोमॅटो, कांदा कोसळला
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पैसे देणारे पीक कांदा, टोमॅटोचे दर दोन रुपये किलोपर्यंत खाली आले. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही त्यातून निघाला नाही. परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले.

 

तूर, हरभरा खरेदीत गोंधळ
यंदा कडधान्याचे भरघोस उत्पादन झाले. मात्र, भाव कोसळले. सरकारने खरेदीची हमी घेतली, त्यातही गोंधळ, गैरव्यवहार झाले. तूर खरेदी अजून सुरू आहे. शेतकऱ्यांना बेभाव विक्री करावी लागली.

 

अवकाळी, गारपीट
खंडित मान्सूननंतर राज्याला अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले. रब्बीचा हाता-तोंडाशी आलेला घास गेला. मोठे नुकसान झाले. नाशिक, मराठवाडा विभागात अनेक पिकांचे नुकसान झाले.

 

पुढील स्लाईडवर पहा, आत्महत्येचा आलेख.... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...