आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरच्या जवानाचा गूढ मृत्यू; कुटुंबाच्या शाेधामुळे 10 दिवसांनी शासकीय इतमामाचा ‘मान’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारज (ता. वैजापूर) - पंधरा दिवसांच्या सुटीवर वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे येण्यासाठी पत्नी व दोन मुलांसह गुवाहाटी ते मुंबई रेल्वेप्रवास करणारे नवनाथ गजानन चोपडे (३६) मध्य प्रदेशातील जबलपूर स्थानकावरून अचानक बेपत्ता झाले. दहाव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बेवारस मृतदेह म्हणून जबलपूर पोलिसांनी त्यांचा   दफनविधी केला होता.

 

नातेवाइकांनी मात्र शोध सुरूच ठेवला आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह उकरून काढत ओळख पटवली. नातेवाइकांच्या पाठपुराव्यामुळे नवनाथ यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी बाभूळगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नवनाथ आसाम न्यू मिसामारी लांबा कॅम्प युनिट ६२६ मध्ये कार्यरत होते. आसामच्या रंगीया रेल्वेस्थानकावरून ते पत्नी व दोन मुलांसोबत गुवाहाटी ते मुंबई या रेल्वे प्रवासाला निघाले. १७ मे रोजी जबलपूर स्थानकावर अचानक तेे बेपत्ता झाले. दहा दिवस उलटून गेले तरी नवनाथ यांचा शोध लागत नसल्याने नातेवाइकांनी जबलपूर येथे जाऊन तेथील एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने शोध घेतला. तेव्हा जबलपूरपासून १५ किलोमीटर अंतरावरील रांझीत १८ मे रोजी एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. शवविच्छेदन करून १९ मे रोजी दफनविधी करण्यात आला होता. नातेवाइकांनी चौकशीची मागणी केल्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. तो मृतदेह नवनाथ यांचाच असल्याची खात्री झाली आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.


दफनविधीसाठी त्या पोलिसांची घाई का?  :  नवनाथ बेपत्ता झाल्याची तक्रार जबलपूर पोलिस ठाण्यात  नोंद केली होती व परिसरातील सर्व बसस्थानक, रेल्वेस्थानकात बेपत्ता झाल्याची माहितीही  पोस्टर्सद्वारे प्रसिद्ध केली होती.  दरम्यान, बेपत्ता व्यक्तीची माहिती ही परिसरात व जिल्ह्यातील  संबंधित प्रत्येक पोलिस ठाण्यात कळवली जाते. परंतु अवघ्या पंधरा किमी अंतरावर असलेल्या रांझी पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही? आणि त्यांनी दफनविधी करण्याची घाई का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


तालुका शोकसागरात बुडाला
नवनाथ २००३ साली जालना जिल्ह्यातील सैनिक भरतीमध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सहा महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा मृतदेह आणल्याची माहिती होताच जवानाच्या अंत्यदर्शनासाठी  जनसागर बाभूळगावात उसळला.  अंत्यदर्शनासाठी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश बोरणारे, भाजप तालुकाध्यक्ष नारायण तुपे, अभय पाटील चिकटगावकर उपस्थित होते. औरंगाबादेतील लष्करी अधिकारी बी. डी. काळे यांच्या नेतृत्वात १६९ रेजिमेंन्टच्या १३ जवानांनी सलामी दिली. मुलगा अनिकेत व मुलगी प्रियंका यांनी पार्थिवाला अाग्निडाग दिला. नवनाथच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

 

घातपाताचा संशय : जबलपूर स्थानकावरून अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. नवनाथ यांचा शोध घेण्यासाठी जबलपूरला गेलेले  नवनाथ यांचे नातेवाइक व बाभूळगावचे माजी सरपंच अण्णासाहेब गायकवाड म्हणाले की, पोस्टमार्टम अहवाल अद्याप मिळालेला नाही. पण त्यांचा घातपात झाल्याची दाट शक्यता आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी.

 

बातम्या आणखी आहेत...