आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धा, नाट्यगृहांची दुरवस्था दूर करणार, नाट्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नावापुरती असू नये. त्याने विधायक कामे करावीत. नाट्य स्पर्धा, नाट्यगृहांची दुरवस्था दूर करून उदयोन्मुखांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यास आपले प्राधान्य राहील, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष बनले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली बातचीत..

 

स्पर्धा, नवख्यांसाठी संधीच्या बाबतीत वानवा दिसते  
आजवर नाट्य परिषदेकडून भरीव काम झाले नाही. ती उणीव आता दूर करू. राज्य नाट्य स्पर्धांची अवस्था भयंकर आहे. स्पर्धांना येणाऱ्या परीक्षकांची राहण्याची गैरसाेय असते. त्यांना योग्य मानधन मिळत नाहीत. बरेचदा परीक्षक पैसे मागतात आणि नाटके आणतात. रंगभूमीची लॅबोरेटरी असलेल्या महाविद्यालयीन स्तरापासून प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करणार आहोत. 

 

राज्यातील नाट्यगृहांची प्रचंड दुरवस्था आहे  
राज्यभरातील नाट्यगृहांमध्ये मोडकळीस आलेले मंच, अत्यंत दयनीय आसनव्यवस्था आहे. नाट्य परिषदेचे या  बाबीवर अंकुशच नसल्याचे हे घडत गेले. नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. नाट्यगृहे बांधण्यापूर्वी नाट्य परिषदेची परवानगी घेणे किंवा आमच्या तज्ज्ञांना त्याविषयी नियोजन दाखवायला हवे.   

 

राजकीय पाठबळ नसताना शक्य नाही
नाट्य परिषद आणि सांस्कृतिक खात्याचा परस्पर संबंधच नाही. एकमेकांना साधी विचारणाही नसते. गावातील सभागृहे नाटकांसाठी असतील तर त्यावर नाट्य परिषदांचा काहीतरी अंकुश असायला हवा. आमचे नाटक ऐनवेळी रद्द केले जातात. २६ जानेवारीला औरंगाबादच्या एकनाथ नाट्यमंदिरात आमचे नाटक होते आणि ते एका राजकीय कार्यक्रमासाठी ऐनवेळी रद्द करण्यास लावले. मग, अशा वेळी राजकीय किंवा शासकीय पाठबळाची आवश्यकता असते.   

 

 

विरोधक पॅनलसाठी नव्हे, स्वत:साठी मते मागत होत  
आमच्या कार्यकारिणीत महाराष्ट्रभरातील लोक आहेत. विरोधक पॅनलने सुरुवातीला एकत्रित आवाहन केले. परंतु नंतर उमेदवारांवर वैयक्तिक टीका अन् स्वत:चा वैयक्तिक प्रचारच सुरू केला. सविता मालपेकर, विजय कदमसारखी मंडळी फक्त स्वत:साठी मत मागत होती. आम्ही एकट्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पॅनलसाठी मत मागितले आणि त्यामुळे आम्हाला विजय मिळाला. 

 

परिषदेच्या सदस्यांच्या यादीत बराच गोंधळ आहे
नाट्य परिषदेच्या सदस्यांच्या यादीत नाटकांशी दुरान्वेयही संबंध नसलेल्यांची नावे आहेत. ते अनेक वर्षांपासून मतदान करत आहेत. नाशिकच्या दोन सदस्यांची नावे मृतांच्या यादीत टाकलेले होते. आपल्या फायद्यासाठी मृतांची नावेही यादीत होती. त्यांच्या मतपत्रिकांवर अन्य मंडळीच शिक्का मारत होती. १०६ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचेही आपण आधी बघितले. आता गुप्त मतदानामुळे पारदर्शकता आली. 

 

बातम्या आणखी आहेत...