आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतिपद राजू वैद्यांनी उडवले; आता बैठकीत खुर्चीही मिळेना! खासदारपुत्र ऋषिकेश यांची शोकांतिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समर्थनगरचे नगरसेवक तथा खासदारपुत्र ऋषिकेश खैरे हे स्थायी समितीचे सभापती होतील, अशी अनेकांची अटकळ होती. परिस्थितीही तशीच होती. परंतु जालीम दवा वापरून ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांनी सभापतिपद आपल्याकडे खेचले. त्यांच्या पहिल्याच बैठकीत विलंबाने आलेले ऋषिकेश यांना तब्बल सात मिनिटे खुर्ची मिळाली नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी आणलेली खुर्चीही तुटकी निघाली. तेव्हा 'माझी खुर्ची वैद्य यांनी तेव्हाच पळवली' असे भाष्य खैरे यांनी केले. शेवटी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी आपली खुर्ची दिल्यानंतरच ते बसू शकले. 


स्थायी समितीचे सभापती कोण, असा प्रश्न बरोबर एका महिन्यापूर्वी सर्वांनाच पडला होता. तेव्हा खासदारपुत्र ऋषिकेश आणि आमदार पुत्र सिद्धांत शिरसाट यांची नावे चर्चेत होती. अर्थात ज्येष्ठतेच्या नात्याने वैद्य बाजी मारणार असेही बोलले जात होते. अखेर तसेच झाले अन् वैद्य सभापतिपदी विराजमान झाले. सभापती झाल्यानंतर गुरुवारी वैद्य यांची पहिलीच बैठक होती. या बैठकीस नेहमीप्रमाणे खैरे विलंबाने आले. तेव्हा त्यांच्यासाठी एकही खुर्ची शिल्लक नव्हती. खैरे येताच कर्मचारी खुर्चीचा शोध घेत होते. हा प्रकार आल्यानंतर वैद्य यांनी 'खैरे साहेबांना उशीर झाला. त्यांची खुर्ची कोणीतरी पळवली' असा चिमटा काढला. तर पत्रकारांकडे बघून 'माझी खुर्ची तर वैद्य यांनीच पळवली, आता कोठे बसू?' असे खैरे म्हणाले. अखेर कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी स्वत:ची खुर्ची खैरे यांना दिली. हा प्रकार अनवधानाने झाला असला तरी याची भलतीच चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. हा केवळ किस्सा कुर्सी का नसून किस्सा नसीब का असल्याचे काही शिवसेना नगरसेवक खासगीत म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...