आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातातील जखमींना मिळणार आता मोफत रुग्णवाहिका सेवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील रस्त्यांवरील उजव्या बाजूचा वापर तत्काळ आणि आपत्कालीन सेवेसाठी करण्यात येईल. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आणि पोलिस गाडीचा सायरन वाजताच नागरिकांनी रस्ता मोकळा करून द्यावा. अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचार मिळावेत म्हणून आता मोफत रुग्णवाहिका सेवा दिली जाईल. यासाठी शहरातील सर्व डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केला. 


एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शनिवारी सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. यासाठी समुपदेशनदेखील अावश्यक आहे. या उपक्रमात महिलांचेही समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे ती मुले आणि पतीला नियमांचे गांभीर्य समजावून देऊ शकते. राइट फॉर इमर्जन्सी या उपक्रमासाठी पुढील तीन महिने जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर मात्र कडक कारवाई करू, असा इशारा भारंबे यांनी दिला. मागील १५ दिवसांत वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. या वेळी आयएमएमचे अध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ, उन्मेष टाकळकर, प्रवीण सूर्यवंशी, डॉ. आनंद निकाळजे, नताशा वर्मा, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या वेळी समुपदेशन फलक, रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या फलकांचेही उद््घाटन करण्यात आले. डॉ. निकाळजे म्हणाले, सप्ताहाच्या निमित्ताने पोलिस आणि डॉक्टर एकत्र आले. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्यांचा जीव कसा वाचवता येईल याबाबत विचार झाला. त्यामुळे इमर्जन्सी फॉर राइट हा उपक्रम समोर आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी केले, तर निरीक्षक मधुकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण, डॉ. नागनाथ कोडे, कैलास प्रजापती, रामेश्वर रोडगे, निरीक्षक हनुमंत गिरमे, सहायक पोलिस निरीक्षक राठोड, तुषार देवरे, माणिक चौधरी, प्रताप नवघरे, अफरोज शेख, वर्षा आघाडे, दीपक बिरारे, तुषार देवरे, शेख, हेमंत तोडकर यांनी परिश्रम घेतले. 


राइट फॉर इमर्जन्सी 
१५ दिवसांत उजवी बाजू ही तत्काळ सुविधेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यासाठी विविध वाहने चालवणाऱ्या चालकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, पोलिसांच्या गाड्यांसाठी उजवी बाजूही यापुढे राखीव ठेवण्यात आली आहे. ग्रीन कॉरिडॉरचीही व्यवस्था असेल. 


मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचा पुढाकार 
शहरात कुठेही अपघात झाला तर विनामूल्य रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होईल. रुग्णवाहिका चालक व पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन पुढाकार घेईल, असे आश्वासन डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी एक मोबाइल अॅप तयार करण्यात येईल. 


शहरात सार्वजनिक वाहतूक का नाही ? 
या वेळी १४ वर्षांच्या फैजान सय्यद याने महत्त्वाचे मुद्दे मांडले. शहरात लाखो वाहने आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. शिवाय प्रदूषण होते. शहरात सार्वजनिक बस का नाही, असा सवाल त्याने उपस्थित केला. मात्र त्याच्या या प्रश्नाला व्यासपीठावरील एकही मान्यवर उत्तर देऊ शकला नाही. 

बातम्या आणखी आहेत...