आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध पित्यास बेदम मारहाण, सून व मुलाविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - वडील दगडू सोनबा दरेकर (६५ वर्षे) यांनी घरातून निघून जावे, म्हणून त्यांचा मुलगा बापू व त्याच्या पत्नीने त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे दगडू यांचा हात तुटला. जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरुन मुलगा आणि सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील हिरडगावमध्ये ही घटना घडली.

 

वयोवृद्ध वडलांनी घरातून निघून जावे आणि त्यांच्याकडे असलेले पैसे मिळावेत, यासाठी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना वारंवार मारहाण करायचा. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घरातून कायमचे निघून जा, आम्ही सांभाळणार नाही, तुमचा काही उपयोग नाही असे म्हणत काठीने बापूने वडील दगडू यांच्या डोक्यात, पाठीत व खांद्यावर मारहाण केली. त्यांच्या गळ्यावर पाय देऊन ठार मारण्याचाही प्रयत्न केला. दगडू यांनी आरडाओरड केली,पण त्यावेळी कुणीच जवळ नव्हते. काही वेळाने नातेवाईक मदतीला आले. त्यांनी दगडू यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांनी या वयोवृद्धाचा जबाब घेतला.
त्यांच्या फिर्यादीवरून बापू दरेकर आणि सून छाया यांच्या विरोधात जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अनिल भरती करत आहेत.

 

अाता जाणार कुठे?
दगडू दरेकर यांची पत्नी दहा-पंधरा वर्षांपूर्वी वारली. एकुलता एक मुलगा आहे. तोच आधार असताना त्याच्याकडूनच मारहाण होते. आता आधार तरी कुणाचा असे म्हणत दरेकर यांनी आपल्या भावना रडत रडत व्यक्त केल्या.