आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढल्याने उघड्या झालेल्या चेंबरकडे १० दिवस दुर्लक्षाने घेतला बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मार्गाने भगवान मोरे पाण्यातून वाट काढत आले आणि खुल्या चेंबरमध्ये पडले - Divya Marathi
या मार्गाने भगवान मोरे पाण्यातून वाट काढत आले आणि खुल्या चेंबरमध्ये पडले

औरंगाबाद- अतिक्रमण काढल्यामुळे उघड्या झालेल्या चेंबरकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने मजूराचा मृत्यू झाला. जयभवानीनगरकडून मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाताना चौकापासून काही अंतरावरच हे उघडे चेंबर आहे. मंगळवारी (१९ जून) रात्री झालेल्या तुफानी पावसाने चेंबरच्या चारही बाजूंनी गुडघ्यापर्यंत साचलेले पाणी साठले होते. वीजही गायब झाली होती. अशा स्थितीत रात्री ११ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडीतून जयभवानीनगरातील घराकडे निघालेले भगवान निवृत्ती मोरे (५०, रा. गल्ली क्रमांक ३, जयभवानीनगर) चेंबरमध्ये पडले आणि पाइपमधून वाहत ३५ फूट रुंद रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले. 


बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. ११ जून रोजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता सुरक्षित करा, चेंेबरवर ढापा टाका, असे आदेश दिले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित करण्यात आले आहे. मोरे मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. दररोज ते सायं. सात वाजता घरी पोहोचत. मंगळवारी ते पावसात अडकले. वाट पाहूनही पाऊस थांबत नाही. घरी मुलगा एकटाच आहे, असे लक्षात आल्यावर ते भरपावसात निघाले होते. ते चेंबरमध्ये पडल्याचे काही दुकानदारांनी पाहिले. पण पाण्याचा लोट सुरू असल्याने त्यांचा नाइलाज झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनाही रात्री शोध घेणे शक्य झाले नाही. 


सकाळी काही स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्याच्या पलीकडील चेंबरवरील जाळी उघडून आत जाऊन पाहिले असता तेथे मोरेंचा मृतदेह गाळात अडकला होता. 


वादामुळे मोहीम रेगाळली
स्थानिक व राजकीय नेत्यांच्या वादात नाल्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम रेंगाळली. यामुळेच आम्ही आमच्या कुटुंबाचा मालक गमावला, असा आरोप मोरेंच्या कुटुंबीयांनी केला आहे. 


दुचाकी उचलून नेल्या
दरम्यान, मोरेंच्या नातेवाइकांच्या दुचाकी घाटी पोलिस चौकीसमोरून पोलिसांनी उचलून नेल्या. त्यांना छावणी पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली. 


तर मृत्यू टळला असता 
मोरे याच परिसरात राहणारे असल्याने त्यांना हा रस्ता, परिसर परिचयाचा होता. मात्र, पावसाच्या पाण्याखाली बुडालेले चेंबर त्यांच्या लक्षात आलेच नाही, असे दुकानदारांनी सांगितले. 


पोलिस माणुसकी विसरले, मृतदेहाची हेळसांड 
मृतदेह बाहेर काढल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांचा लहान मुलगा राजू व पुतण्यांना बोलावल्यानंतर मोरेंची ओळख पटली. त्यानंतर काही तरुणांनी अॅम्ब्युलन्सला बोलावले. ती येण्यास वेळ होता. समोर पोलिसांची टू मोबाइल व्हॅन उभी होती. परंतु त्यांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. शेवटी एका रिक्षातून तो घाटी रुग्णालयात नेला. त्यापाठोपाठ टू मोबाइल व्हॅन आली. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळाची पाहणी करत मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 


मुठीत घट्ट पकडली होती डबा, पैसे असलेली पिशवी 
चेंबरमध्ये पडल्यावरही भगवान मोरेंनी डबा, मजुरीनंतर मिळालेले ७०० रुपये ठेवलेली पिशवी मुठीत घट्ट धरून ठेवली होती. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा ते पाहून सर्वांची मने हेलावली. पैणी (जि. हिंगोली) येथील मूळ रहिवासी असलेले मोरे १५ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पत्नी, दोन मुले, एका मुलीसह औरंगाबादेत आले होते. उन्हाळी सुट्यांसाठी आलेल्या त्यांच्या मुलीने दोन दिवसांपूर्वी हिंगोलीला सासरी जाण्याची तयारी केली. तेव्हा मुलांचे अपहरण, लुटारूंच्या टोळीची अफवा पसरली होती. म्हणून मोरेंनी पत्नी व मोठा मुलगा नीलेशला तिच्यासोबत पाठवले, तर दुसरा मुलगा राजू त्यांच्यासोबत राहिला. आजारी असलेल्या राजूने रात्री उशिरापर्यंत वडिलांची वाट पाहिली. चुलत भावांना कळवले. ते सर्व जण रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधून थकले होते. 

बातम्या आणखी आहेत...