आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाच्या हाताला झटका देत घाटीतून अट्टल घरफोड्या पळाला, आठ दिवसांतील दुसरी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोटदुखीचा त्रास होत असल्याचा बहाणा करत घाटीत उपचारासाठी आणलेल्या शेख वहीद शेख असद (२०, रा. सईदा कॉलनी) या घरफोड्याने वाहनात बसताना पोलिसाच्या हाताला झटका देत पलायन केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घाटीच्या अपघात विभागासमोर घडला. 


पडेगाव, अन्सार कॉलनीतील आरिफ खान दाऊद खान (२६, रा. प्लॉट क्र. २५) यांचे २७ मार्च रोजी मध्यरात्री शेख वहीद याने घर फोडले होते. या वेळी त्याने दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ३० हजारांची रोख असा ऐवज लांबवला होता. प्रकरणाचा तपास करताना छावणीतील पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली होती. दरम्यान, आरिफ खान यांचे घर फोडताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावरून छावणी पोलिसांनी त्याला ३ मे रोजी हर्सूल कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्याला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. 


कोठडीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्याने पोट दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे रात्री छावणी पोलिस ठाण्याचे शेख इस्माईल, ए. जे. शेख आणि अंकुश माळी हे उपचारासाठी घाटीत घेऊन गेले होते. अपघात विभागात त्याच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसताना त्याने शेख यांच्या हाताला जोराचा झटका देत पळ काढला. शेख वहीद पसार झाल्याचे समजताच छावणीसह बेगमपुरा पोलिसांनी घाटीत धाव घेतली. त्याच्या शोधासाठी छावणी पोलिसांची तपास पथके तैनात केली आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात शेख वहीदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दोषींवर कारवाई होणार
आठ दिवसांच्या अंतरावर दोन आरोपी गेले, यापाठीमागचे नेमके कारण काय हे पाहण्यासाठी संबंधित सहायक पोलिस आयुक्तांना चौकशी करून अहवाल मागवला आहे. त्यात कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक आणि पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेकडून घाटीची पाहणी केली जाईल. त्यानंतर कैद्यांच्या तपासणीसाठी वेगळ्या व्यवस्थेबाबत घाटी प्रशासनाशी चर्चा करू, असे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...