आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या अात्महत्या रोखण्यासाठी पवारांनी घेतली शिक्षण संस्थांची बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उच्च शिक्षणाच्या राज्यातील १२ शैक्षणिक संस्थांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी (२६ जून) पुण्यात बैठक घेतली. रोजगारक्षम उच्च शिक्षण देऊन युवकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी एक समितीदेखील स्थापली अाहे. मराठवाड्यातील एमजीएम, मशिप्र आणि मत्स्योदरी शिक्षण संस्था या तीन संस्थांचा समावेश होता. कौशल्य विकासाचे शिक्षण दिले तर ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक युवक नोकरीला लागेल अन् शेतकरी अात्महत्यादेखील थांबतील, असा त्यांचा अंदाज अाहे. 


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पवार यांनी पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सभागृहात संस्थाचालकांशी चर्चा केली. यापुढील काळात पारंपरिक अभ्यासक्रमाद्वारे रोजगार निर्मिती होणे कठीण आहे. त्यामुळे कौशल्य विकासावर अाधारित नव्या अभ्यासक्रमांची रचना करून महाविद्यालयांनी राबवावा, असे बदल त्यांनी सुचवले आहेत. ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. त्यांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर असून त्यांच्या कुटुंबीयांना कायम आर्थिक विवंचनेत राहावे लागते आहे. यामुळे शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. याला प्रतिबंध निर्माण घालायचा असेल तर एक तर शेतीला पूरक व्यवसाय आणि त्यांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला नोकरी असणे गरजेचे आहे. नोकरी मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागातील उच्च शिक्षण संस्था एकमेव माध्यम असून त्यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल स्थापन करून युवकांना नोकरी, रोजगार मिळवून देण्याचे काम केले तर मोठे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले जाईल, असाही विचार पवारांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी शहरातील महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस तथा आमदार सतीश चव्हाण आणि जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेला बैठकीसाठी निमंत्रित केले होते. 


या संस्थांनी घेतला सहभाग 
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे प्रेझेटेंशन झाले. कर्मवीरांचे नातू डॉ. अनिल पाटील यांनी बैठकीत भाग घेतला. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व पंजाबराव देशमुख यांचे नातू हर्षवर्धन देशमुख यांचाही सहभाग होता.काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठाचे विश्वस्त तथा त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव शशिकांत सुतार, बारामतीचे कृषी विकास प्रतिष्ठानच्या सुनंदा पवार, बारामतीचेच विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. प्रभुणे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संदीप कदम, ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव मालोजीराजे, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नीलिमा पवार, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस गेणुजी खानदेशी आदी संस्थांच्या प्रतिनिधींना बैठकीत सहभागी करून घेतले होते. 


मत्स्योदरीचे प्रेझेंटेशन ठरले सर्वांसाठी आदर्श 
'मत्स्योदरी' संस्थेच्या वतीने अंबड येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत कटारे आणि त्यांचे सहकारी डॉ. मिलिंद पंडित यांनी पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशन केले. प्रेझेंटेशनमध्ये कटारे म्हणाले, ' टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स रिसर्च (टीस) यांच्याशी मत्स्योदरीचा सामंजस्य करार झालेला आहे. 'टीस' आणि 'मत्स्योदरी' यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड येथील विद्यार्थ्यांना कौशल्यावर अाधारित अभ्यासक्रम शिकवला जातो. १ हजार ११ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी २५८ जणांना संस्थांमध्ये नोकरी लागली आहे. आठ परिसर मुलाखतीतून विद्यार्थी नोकरीला लागले अाहेत.' कटारे यांचे एेकल्यानंतर पवारांनी संस्थेचे कौतुक केले. सर्व संस्थांनी 'टीस' सोबत संपर्क करून असा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यासाठी डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेत समितीची स्थापना केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...