आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाैरंगाबाद- नगर येथील १०४ वर्षीय अाजीबाईंनी वयाची शंभर पार केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसार मिळणाऱ्या २० टक्क्यांसह अतिरिक्त १०० टक्के पेन्शन मिळावी, या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली अाहे. या प्रकरणात न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
अतिवृद्ध सेवानिवृत्तांना होणारे आजार आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च इत्यादी आरोग्यविषयक बाबी लक्षात घेऊन केंद्राप्रमाणे राज्यानेही वयाची ८० ते १०० वर्षे पूर्ण केलेल्या विधवा कुटुंब निवृत्तीधारकास अतिरिक्त निवृत्तिवेतन लागू करावे, अशी विनंती रुक्मिणीबाई रघुनाथराव लाटे (१०४) यांच्या वतीने अॅड. विठ्ठलराव सलगरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात अाली अाहे. रुक्मिणीबाईंचे पती १९५३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावरून १९५३ मध्ये सेवानिवृत्त झाले हाेते. १९६९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर १९८४ मध्ये रुक्मिणीबाईंना साठ (६०) रुपये कुटुंब निवृत्तिवेतन मान्य करण्यात आले. मात्र राज्य शासनाने केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगातील अतिवृद्ध सेवानिवृत्तांसंबंधीची अतिरिक्त निवृत्ती वेतनासंबंधीची शिफारस स्वीकारली नसल्याचा त्यांचा अाराेप अाहे.
या प्रकरणात शासनातर्फे अॅड. एन. टी. भगत यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी १६ जुलैला होईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार अतिवृद्ध सेवानिवृत्तांना व कुटुंब निवृत्तिवेतन धारकांना वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतर मूळ वेतनाच्या २० टक्के अतिरिक्त निवृत्तिवेतन, ८५ वर्षे पूर्ण केलेल्यांना ३० टक्के, ९० वर्षांसाठी ४० टक्के, ९५ वर्षे पूर्ण केलेल्यांना ५० टक्के तर शंभर वर्षे पूर्ण केलेल्यांना शंभर टक्के अतिरिक्त वेतन मान्य करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब आदी राज्यांनी केंद्राच्या शिफारशी लागू केल्या अाहेत, मात्र महाराष्ट्र राज्याने अद्याप त्या स्वीकारल्या नसल्याचे याचिकेत नमूद केले आहे. सातव्या वेतन आयोगातही केंद्राप्रमाणे या शिफारशी लागू केल्या.
यामुळे केली मागणी
२०१४ मध्ये ८०-१०० वर्षांचे पेन्शनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना राज्याने सरसकट १०% अतिरिक्त मान्य केले आहे. या महिलेस २०१५ मध्ये १०% अतिरिक्त पेन्शन मान्य झाली. तिला मूळ पेन्शन २,८८२ रुपये व अतिरिक्त पेन्शन २८८ रुपये मिळते. मात्र या वयातील आजार व इतर गरजा लक्षात घेता ही रक्कम अपुरी पडते. त्यामुळे १००% अतिरिक्त पेन्शनची मागणी त्यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.