आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळसह देशभरातील पुरातन स्मारकांची छायाचित्रे काढण्याची मुभा; ट्रायपॉड वापरण्यावर निर्बंध कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशभरातील पुरातन वास्तूंमध्ये आता छायाचित्रण करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी असणारी बंदी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) उठवली आहे. यामुळे मोबाइल फोन किंवा कॅमेऱ्याने येथील फोटो घेता येतील. परंतु, पेंटिंग असणाऱ्या वास्तूंमध्ये छायाचित्रणावर बंदी कायम राहील.

 

पूर्वीप्रमाणेच या वास्तूमध्ये ट्रायपॉडही वापरता येणार नाही. पुरातन वास्तूंच्या बाहेर पर्यटक, संशोधक फोटोग्राफी करतात. मात्र, या वास्तूंचे अंतरंग कॅमेऱ्यात टिपणे आतापर्यंत शक्य होत नव्हते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड व्हायचा. कॅमेरा वापरण्यावरून पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आणि पर्यटकांत वादही होत असे. यामुळेच एएसआयने वास्तूमध्ये छायाचित्रणावरील बंदी उठवली आहे. एएसआयच्या अतिरिक्त महासंचालक ऊर्मिला संत यांच्या स्वाक्षरीने १२ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या एका आदेशान्वये ही बंदी मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ज्या वास्तूत पेंटिंग्ज आहेत, तेथे ही बंदी कायम राहणार आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. 


अजिंठ्यात बंदीच 
एएसआयच्या या आदेशामुळे वेरूळला पर्यटकांना लेणींच्या आत फोटो काढता येतील. मात्र, अजिंठ्यात पेंटिंग्ज असल्याने तेथे फोटो काढता येणार नाहीत. अजिंठ्याप्रमाणेच लेह व आग्र्यातील ताजमहालमध्येही फोटो बंदी कायम आहे. फ्लॅशमुळे पेंटिंग्जच्या रंगांवर परिणाम होतो. हे रंग उडून जाण्याची भीती निर्माण होते. यामुळे येथे फोटो काढण्यास पूर्वीप्रमाणेच बंदी असेल, तर लेणीत ट्रायपॉड बसवण्यासही परवानगी मिळणार नाही. 


कॅमेऱ्यासाठी Rs.२५ शुल्क 
आतापर्यंत केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील वास्तूंमध्ये प्रवेश करताना सर्वसामान्य पर्यटकांना कॅमेऱ्याचे शुल्क लागत नव्हते. मात्र, जानेवारी २०१७ पासून कॅमेऱ्याचा वापर सशुल्क करण्यात आला आहे. फोटोच्या कॅमेऱ्यासाठी २५ रुपये, तर व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी ५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. मोबाइल कॅमेऱ्यासाठी मात्र कोणतेही शुल्क नाही. व्यावसायिक उपयोगाच्या कॅमेऱ्यासाठी वेगळे शुल्क लागेल.

बातम्या आणखी आहेत...