आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिरोधक वाण नसल्याने 2 वर्षे गुलाबी अळीचा हल्ला अटळ; येणारा हंगाम कापसासाठी खडतरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- यंदा गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस हातचा गेला. सुमारे १२ ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुळातच हा बीटी कापूस गुलाबी अळीला प्रतिकारक नव्हता असे मत आता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहे. गुलाबी अळीला प्रतिकारक वाण येईपर्यंत आणखी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. बीटीसाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्याही सदोष असल्याने या कापसावर किडींचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे समोर येत आहे. या चाचणीच्या वेळी संबंधित वाण कोणत्या किडीसाठी प्रतिकारक आहे, याची काटेकोर तपासणी होत नसल्याने ही समस्या उद््भवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  


यासंदर्भात ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी सांगितले, संकरित बीटी वाणाच्या प्रक्षेत्रीय चाचण्या काटेकोर पद्धतीने घेतल्या जात नाहीत. संबंधित बीटी वाण मानव, प्राण्यांच्या आरोग्यास तसेच पर्यावरणास धोकादायक नसल्याची खात्री केली जाते. मात्र त्याचा मुख्य हेतू, अर्थात ते कोणकोणत्या किडीला प्रतिकारक आहे, याच्या तपासणीकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ एक वर्षाच्या क्षेत्रीय चाचणीच्या आधारे ते सखोल होत नाही. त्यामुळे बीटीची योग्य पद्धतीने चाचणी होत नाही. दुसरीकडे सदोष बियाणे तसेच अमेरिकन बोंडअळीत उत्परिवर्तन घडल्याने बीटी बियाणे निष्प्रभ ठरते आहे. संकरित बीटी वाणांना केंद्र शासनातर्फे मान्यता दिली जात असताना भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांना डावलले जाते. त्याचा गैरफायदा घेत अनेक खासगी कंपन्यांनी संकरित बीटी बियाणाचा बाजार मांडला आहे.


बॅसिलस थुरेनजेनेसिस अर्थात बीटी या मातीतील जिवाणूचे जनुक घालून बीटी कापसाचे वाण तयार करण्यात आले. यात क्राय १ एसी, एनपीटी II, एएडी ही जनुके आहेत. ही जनुके विशिष्ट प्रकाराची प्रथिने स्रवतात. ही प्रथिने बोंडअळीचे जठर निकामी करतात व बोंडअळी मरते. भारतात २००२ पासून बीटी कापसाच्या लागवडीस मान्यता मिळाली. सध्या बीटी-२ ही दुसरी पिढी लागवडीत आहे. याच वाणांवर गुलाबी अळीचा हल्ला झाला आहे.

 

गुलाबी बोंडअळी प्रतिरोधकचे दावे फोल
बीजी-१ या पहिल्या पिढीतील वाण अमेरिकन बोंडअळीला बळी पडू लागल्याने बीजी-२ चे वाण बाजारात आले. या वाणांत हेलिओथिस आणि स्पोडोप्टेरा अशा दोन्ही प्रकारच्या अळ्यांना प्रतिरोधकता दिसून आली. बीजी-२ गुलाबी अळीला प्रतिरोधक असल्याचा दावा अनेक कंपन्यांनी केला. प्रारंभी यावर कमी प्रमाणात गुलाबी अळी आली. मात्र नंतर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यावर बीजी-२ मध्ये गुलाबी अळी प्रतिरोधकता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता या अळीला प्रतिरोधक जनुक शोधावे लागणार आहे. त्यास वेळ लागणार असल्याने कापूस उत्पादकांसाठी आगामी हंगाम ही खडतरच ठरणार असल्याचे डॉ. नेरकर यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...