आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात उद्यापासून प्लास्टिक बंदी, पाच ते दहा हजार दंड आकारणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यभरात शनिवारपासून प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असली तरी औरंगाबाद शहरात सोमवारपासून (२५ जून) याची अंमलबजावणी होणार आहे. ज्यांच्याकडे प्लास्टिक आहे, त्यांनी ते आणून द्यावे यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी प्लास्टिक उत्पादक, विक्रेते आणि वितरकांवर कारवाई करण्यात येणार असून, पाच ते दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

 

शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील प्लास्टिक उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांची बैठक घेऊन मोहिमेची माहिती दिली. सर्व व्यापारी मनपाला सहकार्य करतील, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. बैठकीस उपमहापौर विजय औताडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रफुल्ल मालाणी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. अर्चना राणे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भांबे तसेच स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.

 

दहा पथके तैनात : प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यासाठी सोमवारपासून दहा पथके कार्यान्वित करण्यात येतील. नऊ प्रभागांसाठी नऊ पथके तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे एक स्वतंत्र केंद्रीय पथक असणार आहे.

 

सुका कचरा म्हणून देणार कंपनीला : सध्या शहरातील सुका कचरा सकलेचा यांच्या कंपनीला देण्यात येतो. संकलन केंद्रावर येणारे प्लास्टिकही कंपनीला देण्यात येणार आहे. त्यामुळे जमा झालेल्या प्लास्टिकची लगेच विल्हेवाट लागेल. दुचाकी अथवा चारचाकीत प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्यास, गाडी वेगात असल्यास जेथून पिशवी आणली त्यांची चौकशी करण्यात येेणार आहे.

 

पुनर्वापरावरही बंदी : शासनाने टीव्ही, फ्रिजच्या आवरणाचे प्लास्टिक, इतर वस्तूंचे आवरण, दूध बॅग किंवा चिप्स, हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातलेली नाही. मात्र, या प्लास्टिकचा एकदा वापर झाल्यानंतर नागरिकांकडून पुन्हा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल.

 

नागरिकांनी करावेत हे उपाय : नागरिकांनी दूध, दही, ताक, द्रव पदार्थ घेण्यासाठी स्टीलच्या डब्यांचा वापर करावा. किराणा, पालेभाज्या खरेदी करताना कापडी पिशव्यांचा वापर करावा. मांस आणि तत्सम पदार्थ घेण्यासाठीही डब्यांचा वापर करावा. घरातील प्लास्टिक संकलन केंद्रात देऊन कागद आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा.

 

या केंद्रांत स्वीकारणार प्लास्टिक
प्रभाग कार्यालय एक : मनपा मुख्य इमारत, टप्पा क्रमांक दोन, टाऊन हॉल
प्रभाग दोन : जुना मोंढा, जाफर गेटजवळ
प्रभाग तीन : मध्यवर्ती जकात नाका, एन- ६
प्रभाग चार : एन- ११ मनपा शाळा, भानुदासराव ताठे सभागृहाच्या बाजूला
प्रभाग पाच : एन- १, सिडको कार्यालयाच्या बाजूला, कॅनॉट गार्डन परिसर
प्रभाग सहा : एन- १ सिडको कार्यालयाच्या बाजूला, कॅनॉट गार्डन परिसर
प्रभाग सात : मालखरे अपार्टमेंट, जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या मागे
प्रभाग आठ : सातारा कार्यालय, जुने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला
प्रभाग नऊ : क्रांती चौक जलकुंभाजवळ

बातम्या आणखी आहेत...