आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदी : ४२ जणांचे पथक आज एकाच वेळी करणार धडक कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्लास्टिक बंदीची सोमवारपासून (२५ जून) शहरात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून ४२ जणांची दहा पथके शहरात एकाच वेळी कारवाई सुरू करणार आहेत. 


मनपाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नऊ झाेनमध्ये चार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच पूर्ण शहरासाठी एक स्वतंत्र केंद्रीय पथक स्थापन केले आहे. या पथकातील कर्मचारी सोमवारच्या बैठकीत निवडण्यात येतील. यात पाच ते सहा अधिकारी-कर्मचारी असतील. प्रभाग कार्यालयातील पथकाकडून प्रभागात तर केंद्रीय पथकाकडून उत्पादक, वितरक आणि प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांसह अन्य दुकानांवर नजर ठेवण्यासह कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कार्यालयीन वेळेपासून प्रभाग कार्यालयात प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांकडून तब्बल पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. गरज भासल्यास रात्री उशिरापर्यंत पथकाकडून कारवाई करण्यात येईल. 


मुख्य बाजारपेठांची होणार तपासणी 
बैठकीनंतर प्राधान्याने शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पथकाकडून कारवाई सुरू करण्यात येईल. दुसरीकडे नऊ प्रभागांतील पथकाकडून त्यांच्या परिसरातील मुख्य बाजारपेठांची तपासणी करण्यात येईल. एकाच वेळी शहागंज, गुलमंडी, टिळक पथ, गजानन महाराज मंदिर परिसर, टीव्ही सेंटर, कॅनॉट गार्डन, घाटी परिसर, निराला बाजार, पैठण गेट, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन आदी भागात कारवाई करण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...