आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरचोरीची अफवा; जमावाचा हिंसाचार: व्हाॅट‌्सअॅप सर्व्हर परदेशामध्ये असल्याने अफवांचा उगम, छडा कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी चमू- व्हॉट्सअॅपवरील फसव्या मेसेजद्वारे राज्यभर पसरलेल्या अफवांमुळे पोरचोर समजून जमावाने हल्ले केल्याच्या घटना वाढत असताना, सायबर गुन्हे कायद्यानुसार यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या घटना ज्यामुळे घडल्या त्या अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोलिस पोहोचू शकलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकाल देताना, आयटी अॅक्ट २००० मधील कलम ६६ (अ) सर्वोच्च  न्यायालयाने रद्द केल्यामुळे अटक करण्यात आलेल्या तीन या अफवेखोरांचीही जामिनावर त्वरित सुटका करावी लागली आहे.


‘व्हॉट्सअॅप’ कडून मूळ सेंडरची माहिती मिळण्यात विलंब   
सोशल मीडियावर कोणते मेसेज टाकले जात आहेत या माहितीपर्यंत पोलिसांना पोहोचणे कठीण होत आहे. एखाद्या पोस्टच्या सेंडरपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, गुगल यांचे सर्व्हर परदेशात असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून माहिती मिळत नाही. त्यामुळे सध्या भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ नुसार अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई हाेेत आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने आमचा भर जनजागृती, पोलिस प्रशिक्षणावरच आहे.   
- बाळसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, सायबर गुन्हे शाखा

 

आयटी अॅक्टमधील कडक कारवाईची तरतूदच रद्द 
सोशल मीडियाची सर्व्हर्स बाहेरच्या देशात असून, भारताकडे त्याच्या अॅक्सेसचे हक्क नाहीत. चीन, अमेरिका या देशांमध्ये सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जाणाऱ्या मेसेजचे नियमन करण्याची यंंत्रणा आहे. आपल्याकडे सायबर क्राइमचे नियमन करण्यासाठी सक्षम यंत्रणा अजिबात नाही. दुसरीकडे श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकालात सर्वोच्च न्यायालयाने आयटी कायद्यातील कलम ६६ अ रद्द केल्याने या अफवांना अटकाव घालण्यासाठी व खोटी पोस्ट व्हायरल केली म्हणून अजामीनपात्र कारवाईची तरतूद तकलादू झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत खोटे मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी शासनाने त्वरित नियमन आणणे गरजेचे आहे. 
- अॅड. सचिन भाटे, सायबर कायदा तज्ज्ञ


राज्यभरात १० घटना, सायबर क्राइमचे मात्र फक्त ६ गुन्हे दाखल, अटक फक्त तिघांना 

 

१ जुलै | राईनपाडा, जि. धुळे : ५ मृत्यू , २५ अटकेत   
या घटनेआधी यूट्यूब चॅनलवरील एक क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. त्यात बाहेरच्या देशातील काही अपहरणकर्त्यांची अर्धी क्लिप जोडून ‘मुले पळवणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, सावध राहा’ अशा आशयाचा मेसेज व्हायरल करण्यात आला होता.   
> सायबर कायद्यांतर्गत कारवाई : एकाची चौकशी करून सुटका  


१ जुलै | सनाउल्लानगर, मालेगाव  : १ जखमी, १३ अटकेत   
प्रवास भाड्यासाठी पैसे नसल्याने भिक्षा मागणाऱ्या जिंतूर तालुक्यातील पाच जणांना जमावाने मारहाण केली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.    
> सायबर क्राइमचा छडा - तपास सुरू आहे  


२८ जून | म्हसावद, जि नंदुरबार  : २०० : आरोपी | अटक : नाही    
पंढरपूरचा माजी नगरसेवक, चालक व शेतकरी हे शेतमजूर शोधण्यासाठी आले असता, जमावाने त्यांना मारहाण केली. पोलिस स्टेशनमध्ये आसरा घेतल्याने त्यांचे प्राण वाचले, परंतु जमावाने त्यांची गाडी पेटवून दिली.   
> सायबर क्राइमचा छडा - नाही  


२९ जून | घोटावणे, जि नंदुरबार : गुन्हा नाही, अटक नाही   
जामनेर आणि भोकरदनमधील ५ जणांना जमावाने मारहाणीचा प्रयत्न केला, ग्रामसेवकाने मंदिरात संरक्षण देत पोलिसांना बोलावले. त्यांचे प्राण वाचले.   
सायबर क्राइमचा छडा - नाही  


२४ जून | करंंजी, जि नंदुरबार : २ जखमी, गुन्हा दाखल नाही  
गुजरातमधील दोघे नातलगांना भेटण्यासाठी आले असता, पोरचोर समजून जमावाने त्यांना मारहाण सुरू केली. नातलगांच्या मध्यस्थीनंतर त्यांना पोलिस स्टेशनमध्ये संरक्षण देण्यात आले.   
>सायबर क्राइमचा छडा - नाही  
 

१५ जून | पडेगाव, औरंगाबाद : मृत्यू - १ | आरोपी : १००, अटक : नाही  

दर्ग्यापाशी ईदी मागण्यासाठी फिरणाऱ्या दोघांना जमावाची मारहाण.
> सायबर क्राइमचा छडा - गुन्हा दाखल


१५ जून | वाळूज , औरंगाबाद : चौकशी सुरू, गुन्हा दाखल नाही  
औद्योगिक वसाहत परिसरात 
कामाच्या शोधासाठी आलेल्या एका महिलेस पोरचोर समजून जमावाने मारहाण केली.    
> सायबर क्राइमचा छडा : नाही  


१५ जून | वाळूज , औरंगाबाद : गुन्हा दाखल नाही, अटक नाही  
भाड्याची खोली  राहण्यासाठी भाड्याची खोली शोधत फिरणाऱ्या एका महिलेचा पोरचोर म्हणून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. महिलेस तिच्या २५ साथीदारांसह तिसगाव चौफुलीहून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा खोटा मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरला. सदर महिलेच्या पतीने पोलिसांशी संपर्क साधून वस्तुस्थिती अवगत केली, मात्र पोलिस अद्याप सेंडरपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.   
> सायबर क्राइमचा छडा -  नाही

 

७ जून | चंदगाव, जि. औरंगाबाद  : २ मृत्यू , ६ जखमी | आरोपी - तीन गावांतील ४०० लोक, अटक - १३   
मध्यरात्री एका शेतात फिरणाऱ्या आठ जणांवर जमावाचा हल्ला, त्यांच्या बेदम मारहाणीत दोघे मृत्युमुखी. मृतांमध्ये औरंगाबाद, बीडमधील पारधी व भिल्ल.     
>सायबर क्राइमचा छडा - नाही   


१५ जून | गोलवाडी, औरंगाबाद : गुन्हा दाखल नाही, अटक नाही  
औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर गोलवाडी ते तिसगाव एएस क्लब चौकादरम्यान एका तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एकास पकडले, तिघे फरार असा खोटा मेसेज व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात, ती तरुणी पुण्याहून औरंगाबादसाठी निघाली असता चुकीच्या स्टॉपवर उतरल्याने एका दुचाकीस्वाराने तिला मदत केली होती. मात्र जमावाने त्यास पोरचोर समजून घेराव घातला. तेथून जाणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप करून त्यांना गर्दीतून बाहेर काढत पोलिस स्टेशनवर नेले.  
>सायबर क्राइमचा  छडा - नाही 

 

वैजापुरात कारवाई; अटक आणि लगेच सुटका
- ४ जून रोजी कृषिरत्न या व्हॉट्सअॅप ग्रुपवर खुंटे पिंपळगावमध्ये एका मुलीस चोरट्यांनी पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंत जाळले असा मेसेज व्हायरल झाला. पोलिस पाटील राजू आहेर यांच्या मोबाइलवरील या ग्रुपवर हा मेसेज येताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्वरित संबंधित घटनेची चौकशी केली असता असे गावच अस्तित्वात नसल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोयम मुंडे यांच्या आदेशाने पोलिसांनी या ग्रुपवर हा मेसेज पाठवणारा संदीप जाधव विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.   
- सुशील निकम आणि ग्रुप अॅडमिन ज्ञानेश्वर घोडके यांनी ग्रुपवर पोरचोरांचा खोटा मेसेज पोस्ट केला होता. त्याचा छडा लावून वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात सीआरपीसी  
- तिसरा आरोपी पवन भक्कड यासही पोरचोरी आणि बलात्काराची खोटी पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलमे - १५३, १८२, २९०, २६८, ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
- नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि मालेगावमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे पोरचोरांची अफवा पसरवल्याबद्दल विजय निकम आणि अनिल धीवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईची गरज
- सोशल मीडियाच्या नियमनाचे (मॉनिटर अँड फिल्टर) अधिकार आणि यंत्रणा पोलिसांकडे असावी 
- मेसेज फॉरवर्ड करणे म्हणजे त्यातील आशयाशी सहमत असणे हे गृहीत धरून कारवाई करणे  
- समाजविघातक खोटे मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात, पसरवणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे

बातम्या आणखी आहेत...