आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासासाठी आलेल्या गाेंदी पोलिसांनी घरातून ११.५ लाख घेतल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संशयित आरोपींच्या अटकेसाठी रविवारी रात्री औरंगाबादेत छापा टाकणाऱ्या गोंदी पोलिसांनी घरातून साडेअकरा लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सचिन गणपतराव सांळुके (रा. समर्थ अपार्टमेंट, सातारा परिसर) यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रारही दिली आहे. मात्र, या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. २ लाख दिले तर तुमची रक्कम परत करू, अशी मागणी पोलिसांनी केली असा दावाही साळुुंके यांनी केला आहे. दुसरीकडे नियमाप्रमाणेच कारवाई झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 


वाळूच्या वादावरून २ जून रोजी गोंदी येथे दोन गट समोरासमोर आले. या वेळी राहुल राक्षे (रा. पुरण, ता. अंबड) याच्यावर विजय साळुंके, सुयोग साळुंके, अमोल मार्गे आणि रघुनंदन मार्गे यांनी प्राणघातक हल्ला चढवला. राक्षेच्या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी त्याच्या औरंगाबादेतील काकाच्या घरी असावेत, असे तपासादरम्यान लक्षात आले. त्यानुसार रविवारी रात्री अकराच्या सुमारास गोंदी ठाण्याचे उपनिरीक्षक अमन शिरसाट, सहायक फौजदार नसीर मुसा सय्यद यांच्यासह राक्षे व अन्य दोन ते तीन जण खासगी वाहनाने शहरात आले. देवळाई चौकाजवळील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील सचिन साळुंके यांच्या फ्लॅट क्र. १ मध्ये सर्वजण पोहोचले. सचिन साळुंके हे बागायतदार असून त्यांचा भाऊ सरपंच तसेच शिवसेनेचा पदाधिकारी आहे. 


सचिन साळुंके यांनी दरवाजा उघडताच गोंदी पोलिसांसह पाच ते सहा जण घरात शिरले. पोलिसांनी फ्लॅटचा ताबा घेताच दोघांनी बेडरूम, बाथरूम, तर दोघांनी गॅलरी व घराची झडती सुरू केली, तर एकाने आरोपींबाबत कसून विचारपूस सुरू केली. या घरझडतीत गोंदी पोलिसांनी दहा लाख आठ हजार रुपये ताब्यात घेत कारने (एमएच ११ एके ६३४६) सातारा ठाणे गाठले. तेव्हा साळुंके त्यांच्या मागावर होते. पाच मिनिटे सातारा ठाण्यात थांबल्यावर गोंदी पोलिसांनी जवाहरनगर ठाणे गाठत अर्धा तास घालवला. तोपर्यंत पहाटे तीन वाजले होते. यानंतर गजानन महाराज मंदिराजवळील एका हॉटेलात त्यांनी नाष्टा केला. त्यानंतर पुंडलिकनगर ठाणे गाठले, असे सांळुके यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. 


आयुक्तांकडे करणार तक्रार 
पुंडलिकनगर पोलिसांना माहिती न देता गोंदी पोलिसांनी घरावर छापा मारला. ११.५ लाख जप्त करूनही पोलिस १० लाख ८ हजार जप्त केल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी तडजोडीचाही प्रयत्न केला. दहा लाख परत देऊ, त्यातील दोन लाख आम्हाला द्या, अशी मागणी केली, ती मान्य केली नाही, असेही साळुंके म्हणाले. दरम्यान, हे पथक ठाण्यात नोंद करून आले नसल्याचे लक्षात आल्याने साळुंके यांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दिली. ते तक्रार घेत नसल्याने पोलिस आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे साळुंके म्हणाले. 


आमच्याकडे नोंद नाही; पंचासमक्ष रक्कम मोजू 
प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींच्या शोधात गोंदी ठाण्याचे उपनिरीक्षक अमन शिरसाट पथकासह आले होते. पण त्यांनी आमच्या ठाण्यात कारवाई करणार असल्याची नोंद केली नाही. घरावर छापा मारत या पथकाने मोठी रक्कम जप्त केल्याची सचिन साळुंके यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर कारवाई केली जाईल. पंचांसमक्ष रक्कम मोजली जाईल. 
- लक्ष्मीनारायण शिनगारे, निरीक्षक, पुंडलिकनगर 


परवानगी घेऊनच केली कारवाई 
गोंदी ठाण्यात नोंद करूनच पथक रवाना झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या परवानगीनेच त्यांना तपासासाठी पाठवले. तेथून आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून पंचासमक्ष १० लाख ८ हजार २८९ रुपये जप्त केले. या रकमेचा पंचनामाही केला आहे. मात्र, साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीबाबत वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई केली जाईल. आरोपी तेथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतरच कारवाई केली. 
- अनिल परजणे, सहायक पोलिस निरीक्षक, गोंदी 

बातम्या आणखी आहेत...