आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगव्या ध्वजासोबत हाती राष्ट्रध्वज घेऊन वारकऱ्यांनी काढली प्रबोधनाची 'दिंडी,' वाटेत राबवतात स्वच्छता मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'आदर्श गाव, आदर्श दिंडी' या घोषवाक्याखाली लोहसर खांडगाव (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथून निघालेली ३०० वारकऱ्यांची 'विनावर्गणी' दिंडी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. भगव्या ध्वजासोबत राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कीर्तन-प्रवचनासोबत सकाळ-संध्याकाळ दोन वेळा राष्ट्रगीतही होते. ज्या मार्गावरून जात आहेत तिथे घाण असेल तर ती साफ करत ही दिंडी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. 


पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र-कर्नाटकातून सुमारे दोन हजारांच्या वर दिंड्या जातात. अहमदनगर, पुणे, सोलापूरमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. दिंड्या ज्या गावी मुक्क्कामी थांबतात त्या ठिकाणी अनेकदा अस्वच्छता, घाण करतात. दिंड्या गेल्यानंतर झालेली अस्वच्छता स्थानिक गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत असते. या प्रश्नावर तोडगा काढून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आदर्श गाव लोहसर खांडगावने या वर्षीपासून ही आगळीवेगळी दिंडी सुरू केली आहे. त्यानुसार अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतून १० दिवस पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच अनिल गिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून रवींद्र महाराज जोशी, रामभाऊ महाराज वांढेकर, डॉ. गिते, रावसाहेब वांढेकर यांनी गावातील २०० महिला व १०० पुरुषांना सोबत घेत ही 'आदर्श दिंडी' काढली आहे. विशेष म्हणजे दिंडीत सहभागी ग्रामस्थ वारकऱ्यांकडून वर्गणी घेण्यात आलेली नाही. 


आपल्या १० दिवसांच्या पायी प्रवासात लागणाऱ्या सुमारे ५० गावांमध्ये ही दिंडी प्लास्टिक बंदी, स्वच्छता, पाणी वाचवा, बेटी बचाव अादी संदेश देत राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्याचे काम करत आहे. दिंडीत राष्ट्रध्वज हाती घेतलेले तरुण गावोगावी लक्ष वेधून घेत आहेत. सकाळी प्रस्थान करण्यापूर्वी व रात्री मुक्कामी ठिकाणी राष्ट्रगीत म्हणून ही दिंडी गावोगावी राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागवत आहे. 


यापूर्वीही राबवलेत आदर्श उपक्रम 
लोहसरला सर्व धार्मिक कार्यक्रमातील मंडपात जेवढे भगवे ध्वज असतात तेवढेच राष्ट्रध्वज लावले जातात. राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी भैरवनाथ जयंतीनिमित्त वर्षातून एकदा भगवी पताका व तिरंगा घेऊन पाथर्डी तालुक्यातील ४० गावांमध्ये १०० युवकांची मोटारसायकल रॅली काढली जाते. गावात आत्तापर्यंत सुमारे १० हजार झाडे लावली असून ती जगवण्यात आली आहेत. दहावा किंवा तेराव्याला तसेच स्मृतिदिनानिमित्त या गावात वृक्षारोपण केले जाते. 


पुढच्या वर्षीही दिंडी असेल 
वारीच्या रस्त्यांची व गावांची स्वच्छता करण्याचा मानस घेऊन आम्ही ही दिंडी सुरू केली आहे. राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्याचे कामही केले जात आहे. रोज नित्याने राष्ट्रगीतानंतर मुक्काम केला जातो. पुढच्या वर्षीही ही 'आदर्श गाव, आदर्श दिंडी' सुरू राहील. 
- अनिल गिते, सरपंच, लोहसर खांडगाव (ता. पाथर्डी) 

बातम्या आणखी आहेत...