आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंटच्या दरात बॅगमागे 95, तर स्टील किलोमागे १० रुपयांनी महाग; सामान्‍यांना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अवघ्या महिनाभरात सिमेंटच्या दरात बॅगमागे ९५, तर स्टीलच्या दरात किलोमागे १० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न अडचणीत येणार आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रातच झालेल्या या दरवाढीमुळे गृह प्रकल्पाच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढणार अाहेत. यामुळे पै-पै जमा करून घर बांधणाऱ्यांची दमछाक होणार आहे.

 

सिमेंट कंपन्यांनी ही दरवाढ केल्याचा बांधकाम व्यावसायिकांचा आरोप आहे. सिमेंट आणि लोखंड हे बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचे घटक आहेत. देशात सिमेंटची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होते. यामुळेच महाराष्ट्रात सिमेंटचे दर नेहमीच सर्वाधिक असतात. मात्र, आता यात महिनाभरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी महिन्यात ५० किलोची सिमेंटची बॅग २२० रुपयाला मिळत होती.


१ एप्रिल रोजी ८५ रुपयांची वाढ होऊन किंमत ३०५ रुपये झाली, तर आज यात आणखी १० रुपयांची वाढ होऊन सिमेंटची बॅग ३१५ रुपयांवर पोहोचली. फेब्रुवारीमध्ये स्टील २७ रुपये किलो होते. एप्रिलमध्ये ते ३८ रुपये झाले आहे. वाहतूक आणि २८ टक्के जीएसटी धरून हे दर ४८ रुपयांवर जातात. या तुलनेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात सिमेंटची बॅग २०५, तर राजस्थानात २२० रुपयांत मिळते हे विशेष. 

 

बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले   
दर वाढल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे. २२० रुपये बॅगच्या हिशेबाने घराचे बांधकाम करणाऱ्याचे ४० टक्क्यांपर्यंत दर वाढल्याने बजेट कोलमडणार आहे. यामुळे बांधकाम अर्धवट सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, तर बांधकाम व्यावसायिकांना माेठा फटका बसणार आहे. विकलेल्या घराच्या दरात वाढ करता येणार नाही. यामुळे दरवाढीचा फटका त्यांनाच सोसावा लागणार आहे. दुसरीकडे रेरा कायद्यामुळे वेळेत प्रकल्प पूर्ण नाही केले तर दंडही भरावा लागेल.

 

काय म्हणाले होते गडकरी..   
सिमेंट कंपन्यांच्या कारटेल पद्धतीवर  नितीन गडकरी यांनी ९ मार्च २०१८ रोजी  नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात टीका केली होती. कारटेलमुळे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू महागल्या तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.   

 

पिळवणूक टाळण्यासाठी हस्तक्षेप करावा
सिमेंटच्या दरातील मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अर्धवट राहणार असल्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या टेंडरसाठी कंपन्यांनी दरवाढ केलीय.  मात्र, यामुळे बांधकाम व्यावसायिक, सर्वसामान्यांची पिळवणूक होणार आहे. हे टाळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा.  
-गोविंद अग्रवाल, संचालक, कल्याणी बिल्डर्स

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, दरवाढ होण्याची कारणे...

बातम्या आणखी आहेत...