आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात सर्वदूर पाऊस, अनेक धरणांतून विसर्ग, गाेदेला पहिला पूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/ पुणे- अखेर पावसाने अवघा महाराष्ट्र चिंब करून टाकला. रविवार, सोमवारी राज्यभरात सर्वदूर पाऊस बरसला. मराठवाडा, मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व कोकणात अनेक ठिकाणी पावसाने झड लावली. धरणांच्या जलसाठ्यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. काही धरणांतून विसर्गही सुरू झाला आहे. अाैरंगाबाद शहरातही साेमवारी दिवसभर संततधार सुरू हाेती. शहरात ४७ मिमी पावसाची नाेंद झाली. 

 

गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या २४ तासांत वाढला आहे. जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे.  


महाबळेश्वरच्या डोंगरात गेल्या २४ तासांत तब्बल ३०० तर लोणावळ्यात २८५ मिमी इतका तुफानी पाऊस कोसळला. हवामान खात्याने येत्या २४  तासांत राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. खडकवासला परिसरात गेल्या ३ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने धरण ओव्हरफ्लो झाले. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणातून सोमवारी सकाळपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सकाळी १० वाजता धरणातून ३,४३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी ५,१३६ क्युसेक वेगाने पावसाचा विसर्ग सुरू झाला. दिवसभर पाऊस पडत राहिल्याने सायंकाळी ६ वाजता थेट १३,९८१ क्युसेक पाणी सोडले. रात्रभर पावसाची शक्यता असल्याने नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या पुणे मेट्रोचे कामही मुठा नदी दुथडी वाहू लागल्याने ठप्प पडले आहे. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण साठ टक्के भरले आहे. शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. पुनावळ्याचा बंधारा ओसंडून वाहू लागल्याने चिंचवड गावातल्या मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.


काेयना धरणातीलसाठा ७० टक्क्यांवर  
सह्याद्री डोंगररांगांजवळच्या कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातल्या परिसरातही गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला. सह्याद्री घाटमाथ्यावरच्या दावडी, ताम्हिणी, आंबोणे, वळवण या गावांना प्रत्येकी तब्बल अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपून काढले. वीजनिर्मितीसाठी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे कोयनेचा धरणसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.
  

वेण्णा तलाव परिसरातील स्ट्रॉबेरीच्या बागा पाण्यात
महाबळेश्वरमध्ये २४ तासांत तब्बल ३०० मिमी म्हणजेच १२ इंच पावसाची नाेंद झाली. या ठिकाणी चालू हंगामातील अातापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस साेमवारी सकाळपर्यंत पडला. त्यामुळे वेण्णा तलाव परिसरातील मळेधारकांच्या घरांना तसेच स्ट्राॅबेरीच्या बागांना पाण्याने वेढले हाेते. पाचगणीकडे जाणारा रस्ता जलमय झाला. त्यामुळे वाहतूक अनेक तास ठप्प हाेती.  महाबळेश्वरमध्ये जूनअखेर येथे ८०० मिमीपर्यंत पाऊस पडला हाेता. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ही अाकडेवारी ५०० मिमीने कमी हाेती. वेण्णा तलावही भरला नव्हता. ५ जुलैपासून या भागात दमदार पावसाला सुरुवात झाली. साेमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सुमारे ३०० मिमी पावसाची नाेंद झाली. या पावसामुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांना साेमवारी अघाेषित सुटी हाेती.   

बातम्या आणखी आहेत...