आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिराच्या नावाखाली देशभरात पुन्हा दंगली घडवल्या जातील : राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चार वर्षे भाजपला विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे अमित शहांनी आता राम मंदिराचा मुद्दा समोर आणला. देशभरात राम मंदिराच्या नावावर दंगली घडवायच्या, त्यामुळे सर्व हिंदू मते एकत्र येतील, असे त्यांना वाटते. पक्ष बहुमतात असताना चार वर्षे यांना राममंदिराची आठवण झाली नाही. निवडणुकांना वर्ष राहिले असता हा मुद्दा काढण्याचे कारण काय? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी गुरुवारी तापडिया नाट्यमंदिरात जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. 


राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी गुरुवारपासून औरंगाबाद येथून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. यानिमित्त झालेल्या मेळाव्यास शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते, तरुणांनी गर्दी केली होती. तुमच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहे, असे म्हणत ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. पुढील ३७ मिनिटे त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. औरंगाबाद आणि जिल्ह्यातील लोक सत्ताधाऱ्यांना कंटाळले आहेत. मात्र, त्यांना सक्षम पर्याय उभा राहत नाही. आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांना पुरून उरत नाहीत. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. शहरात कचऱ्याचा एवढा मोठा प्रश्न असतांना भाजप आणि शिवसेनेचा पोरखेळ सुरू आहे. मात्र, त्यांना प्रश्न विचारण्यास कोणीही तयार नाही. २५ वर्षांपासून शिवसेनेला या शहराची सत्ता दिली आहे. मात्र, शहराची अवस्था बकाल झाली आहे. लोकांना याचा राग येत नाही, याचेच मला दु:ख वाटते. राज्यातही सावळा गोंधळ आहे. राज्याविषयी अस्मिता उरलेली नाही. "नीट'मधील चार प्रश्न चुकले तर तामिळनाडूचे खासदार संसदेत प्रश्न विचारतात. मात्र, आपले खासदार "ब्र'देखील काढत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. हे सरकार अतिशय खोटारडे आहे. 


केंद्रात मोदी अन् राज्यात फडणवीस खोटे बोलतात. यांच्यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बरे म्हणण्याची वेळ आली आहे. या सरकारमधील मंत्री दिल्लीहून हाकले जातात. "हाकतात' हा शब्द कशासासाठी वापरतात हे आपल्याला माहिती असेलच. (त्यावर समोरून "बैलाला हाकतात' असे उत्तर आले). त्यावर "आजकाल बैलं जाकीटही घालायला लागली आहेत', असा टोला राज यांनी लगावला. या वेळी मनसेचे राज्य सचिव अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, राजेश येरुणकर, जावेद शेख, अनिल शिरुरे, दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी, भास्कर गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्ण मेळाव्यादरम्यान अमित ठाकरे व्यासपीठावरील विंगेत उभे होते. 


दंगलीमुळे विप्रो गेली 
औरंगाबादेत दंगल झाली त्याच दिवशी विप्रो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक शहरात आले होते. २५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा त्यांचा विचार होता. मात्र, दंगलीमुळे त्यांनी तो बदलला, असे राज यांनी सांगितले. शहर खड्ड्यात जाताना दिसतंय, मात्र तुम्ही काहीच करत नाही. ही लोकं धर्माच्या नावावर घाबरवणार आणि तुम्ही घाबरणार. राजकीय स्वार्थासाठी दंगली घडवल्या जातात, असा आरोपही त्यांनी केला. 


देशभरात आणीबाणी 
या सरकारविरोधात कोणी बोलू नका, निवडणूक आयोग यांच्या हातात, रिझर्व्ह बँकेवर यांचे नियंत्रण, देशभरातील काही प्रसारमाध्यमे यांच्या हातात. त्यामुळे यांच्या विरोधात कोणी बाेलूच नका, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. देशभरात ईव्हीएम मशीनचा घोटाळा करून भाजप सत्तेवर आले. गत निवडणुकीत आमच्या काही उमेदवारांना शून्य मते मिळाली, हे कसे घडले, हे मला कळत नाही. किमान त्याचे एकट्याचे तरी मत त्याला मिळेल. त्यामुळे यापुढील मतदान मतपत्रिकांवर घ्यावे, अशी मागणी राज यांनी केली.

 
...म्हणून मीही बदलली भूमिका 
मोदी पंतप्रधान व्हावेत, हा विचार सर्वप्रथम मी मांडला. भाजपतूनही अशी मागणी होत नव्हती, त्या वेळी मी हे म्हणालो होताे. मात्र, हा माणूस पंतप्रधान झाला आणि बदलला. मग माझी भूमिका बदलायला नको का? ही लोकं खोटं बोलतात आणि तुम्ही टाळ्या वाजवता. लोक येतात मोठमोठे आकडे जाहीर करतात आणि तुम्ही भाळता. 

 

आजपासून इच्छुकांच्या भेटी 
अंडी उबवणारे पदाधिकारी मला नको. समाजासाठी काम करू इच्छिकणाऱ्या तरुणांना संधी देण्यासाठी मी तयार आहे. इच्छूकांनी साध्या कागदावर अर्ज करावा. मी त्यांची भेट घेईन, असेही त्यांनी सांगितले. या आवाहनानंतर १५० निवेदने जमा झाली असून यात नगरसेविकेसह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अंतिम यादी तयार करून पुढील दोन दिवस त्यांना 'राज'भेटीची संधी दिली जाईल. 


विप्रोत गुंतवणुकीचा विचारच नव्हता 
राज यांनी विप्रोविषयी केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे 'दिव्य मराठी'च्या पडताळणीत समोर आले. अझीम प्रेमजी यांच्या मालकीचा विप्रो लायटिंगचा प्रकल्प ३० वर्षांपासून वाळूजच्या एल सेक्टरमध्ये आहे. तेथे किंवा अन्यत्र कुठेही विस्तारीकरण, गुंतवणुकीचा विचारच कंपनीने केलेला नाही. नव्या प्रकल्पाची तयारी सुरू नाही, असे कंपनीच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. दंगल झाली त्या दिवशी अझीम प्रेमजी यांच्यासह कंपनीतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा रद्द झाला, तो निव्वळ योगायोग होता, असे स्पष्ट करण्यात आले. तर सीएमआयएचे पदाधिकारी म्हणाले की, जी गुंतवणूक होणारच नव्हती ती गेली असे राज यांचे म्हणणे केवळ राजकीय आहे. औरंगाबादची बदनामी एवढाच त्यांचा हेतू दिसतो. 


आता बघू शिवसेना नेमके काय करते 
सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव आणला जाणार आहे. या वेळी बघू शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल. अर्थात राज्यात भाजपविरोधात तोंडभरून बोलणारी शिवसेना घरंगळत सरकारमागेच जाईल, याची खात्री आहे. भांडणाचे हे नुसते नाटक आहे, असेही राज यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...