आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्कल पडलेल्यांनी केस ठेवण्याची भाषा करू नये; सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवेंचा पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- आपल्या बेताल वागण्याने ज्यांना कायमचे टक्कल पडले आहे त्यांनी आपणास पराभूत केल्याशिवाय डोक्यावर केस उगवू न देण्याची शपथ घेणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणे होय, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार यांच्यावर केला. औरंगजेब बादशहालाही शिवाजी महाराजांबद्दल असेच वाटले होते. परंतु त्या आलमगिराला कधीच छत्रपती शिवाजी महाराजांवर विजय मिळवता आला नाही. सलग आठ वर्षे झुंजूनही त्याचे थडगेच येथे बांधावे लागले होते. त्यामुळे सत्तारांनी कितीही वल्गना केल्या तरी त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा टोलाही खा. दानवे यांनी आमदार सत्तार यांन हाणला. 


आ. सत्तार यांनी लोकसभेत खा. दानवे यांना पराभूत करण्याचा पण केल्याचे तसेच आपला मुलगा समीर यांना २०१४ मध्ये सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढण्याबाबत आमदार सत्तारांनी घोषणा केल्यानंतर खा. दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा 'दिव्य मराठी'ने प्रयत्न केला असता खासदार दानवे यांनी आ. सत्तारांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "केवळ स्वप्न पाहणारांना कधीच यश मिळत नाही. सत्तारांचे टक्कल पडले आहे. आपल्या डोक्यावर केस असल्याचे उसणे अवसान आणून ते नागरिकांना सांगत आहेत. ज्यांचे टक्कलच पडले तेथे केस कोठून येणार. आपले टक्कल लपवण्यासाठी त्यांनी कधीही पूर्ण न होणारी शपथ घेतली आहे. आपण सत्तरांकडून पराभूत होणारच नाही. तेव्हा डोक्याचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासाठी त्यांना डोक्यावर किमान टोपी तरी घालता येईल', अशा शब्दांत त्यांनी आमदार सत्तारांची खिल्ली उडवली. 


त्यांनाच भविष्याची चिंता 
आपल्या विरोधात आ. सत्तार , राज्यमंत्री अर्जुन खोतकर तर आहेतच. शिवाय भाजपमध्येही तुम्हाला मोठा विरोध होत आहे, याबाबत खासदार दानवे यांना छेडले असता त्यांनी पक्षात विरोध असल्याची केवळ चर्चा रंगवली जात असून सत्तार आणि खोतकरांनाच भविष्याची चिंता सतावत असल्याचे सांगितले. आपण जालना आैरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा हजार कोटींची रस्त्यांची कामे मंजूर केली असून त्यास सुरूवातही झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढा निधी खेचून आणला. जालना येथे केमिकल संस्था आणि ड्रायपोर्ट आणले. त्यामुळे आंब्याच्या झाडाला कुणीही दगड मारणार. बाभळीच्या झाडाला दगड मारून काय मिळेल, असे खा. दानवे यांनी सांगितले. 


स्वत: खासदार, मुलाला आमदार हे तर स्वप्नरंजन! 
स्वत: खासदार होण्याचे आणि मुलाला आमदार करण्याचे आमदार सत्तार यांचे स्वप्न म्हणजे केवळ स्वप्नरंजनच आहे. त्यांच्या सत्ताकाळात रखडलेला आैरंगाबाद - जळगाव रोड आपणच पूर्ण करीत आहोत, असा दावाही भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...