आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात लोकसभा, विधानसभा लढणार : खासदार राजू शेट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही शेतकरी सन्मान यात्रा काढत आहोत. तसेच लोकसभा, विधानसभेसाठी चांगले उमेदवार मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाड्यात उमेदवार देईल, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. 


मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारसे आंदोलन होत नसल्यामुळे शेट्टी यांनी येथे लक्ष घालण्याचे ठरवले आहे. पुन्हा धर्मा पाटील होऊ देणार नाही. या अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावात सभा घेऊन या अभियानाची सुरुवात झाली आहे. १ मेपासून सुरू झालेल्या शेतकरी सन्मान अभियानाचा ९ मे रोजी उस्मानाबाद तालुक्यात शिराढोण येथे समारोप होणार आहे. 


शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी शासनासह शेतकरी चळवळीवरही अविश्वास दाखवला आहे. शेतकऱ्यांचे मन परिवर्तन करण्यात चळवळीतले लोक कमी पडले असून त्यांनीही विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनो कुणी त्रास दिला तर आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.


एकेकाळी शेतकरी संघटनेचे पाच आमदार
शरद जोशी यांची संघटना असलेल्या शेतकरी संघटनेचे १९९० ते १९९५ दरम्यान ५ आमदार होते. आता संघटनेचा एकही आमदार नाही. जोशी यांच्या निधनानंतर मराठवाड्यात चळवळ थंडावली आहे. त्यामुळे कडक उन्हातही सभा घेऊन शेट्टी यांच्याकडून मराठवाड्यात ताकदीने पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, शेट्टींचे हे प्रयत्न केवळ स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. सत्ताधारी पक्षासोबत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास तवार, शेतकरी संघटनेचे नेते श्रीकांत उमरीकर यांनी केला आहे. 


शेतकरी व्होट बँक हवी 
मराठवाड्यात संघटन मजबूत करत आहोत. येथे शेतकऱ्यांची व्होट बँक तयार होणे गरजेचे आहे. स्वच्छ चारित्र्याचे, चळवळीशी संबंधित असलेले लोक आमच्याकडे आले तर लोकसभा, विधानसभेला त्यांना उमेदवारी देऊ. नुकतेच माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आमच्याकडे आले होते. चांगल्या लोकांना संधी देऊ. 

बातम्या आणखी आहेत...