आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपीआरएस सिस्टिमच्या वापराने कमी झाला पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कुठलीही घटना घडल्यानंतर पोलिस कमीत कमी वेळेत कसे घटनास्थळी पोहोचू शकतात यासाठी कायम अभ्यास सुरुअसतो. यासाठी वेगवेगळे प्रयत्नही केले जातात. गेल्या सहा महिन्यांत औरंगाबाद शहर पोलिसांनी गतवर्षीपेक्षा ११ मिनिटे कमी वेळा घटनास्थळी पोहोचल्याचा म्हणजे रिस्पॉन्स टाइम कमी केल्याचा दावा  केला आहे. जीपीआरएस सिस्टिमचा उपयोग केल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी १९ मिनिटेे ४७ सेकंद असलेला रिस्पॉन्स टाइम आता सात मिनिटे ४७ सेकंदांपर्यंत आल्याचा दावा केला जात आहे. 


पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी कार्यभार स्वीकारल्यावर रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला. १७ पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा, मुख्यालय व इतर अधिकाऱ्यांच्या गाडीत जीपीआरएस सिस्टिम बसवली आहे.  मुख्यालयातील सर्व्हिलियन्स रूममध्ये शहरात फिरणाऱ्या शहर पोलिस दलाच्या प्रत्येक गाडीचे ठिकाण दिसते. त्यामुळे कुठलीही घटना घडल्यानंतर घटनास्थळाच्या जवळ असलेल्या वाहनचालकाला फोन करून घटनेची माहिती दिली जाते. या पद्धतीने हा रिस्पॉन्स टाइम कमी करण्यात आला.


कसा काढला जातो रिस्पॉन्स टाइम
पोलिस कंट्रोल रूमला घटना घडल्याची माहिती मिळताच  घटनास्थळाच्या जवळ पोलिसांची कोणती गाडी आहे. हे सर्व्हिलन्स रूममधून शोधले जाते आणि त्या गाडीला घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले जातात. या वेळी ती गाडी कुठल्या पोलिस ठाण्याची आहे किंवा कुठल्या कामासाठी जात आहे हे पाहिले जात नाही. त्यामुळे साडेसात मिनिटांच्या आत पोलिसांना घटनास्थळी पोहचणे शक्य झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत संबंधित वाहनाला दिलेली सूचना आणि त्यांची घटनास्थळी पोहोचल्याची वेळ यांचा अभ्यास करून रिस्पॉन्स टाइम निश्चित करण्यात आला.


यापूर्वी झाले होते प्रयत्न 
यापूर्वी तत्काळ मदतीसाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चार्ली संकल्पना सुरू केली होती. सुमारे ४० दुचाकींवर दोन पोलिस कर्मचारी २४ तास शहराच्या पेट्रोलिंगवर होते. मात्र जीपीआरएस सिस्टिम नसल्यामुळे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य नव्हते.


एक तास गाडी एका ठिकाणी असल्यास कारणे दाखवा नोटीस
शहरातील ८५ पोलिसांच्या वाहनांमध्ये जीपीआरएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात पोलिस ठाण्याची पीटर मोबाइल, टू मोबाइल, थ्री मोबाइल व्हॅनचाही समावेश आहे. या माध्यमातून २४ तास किमान ४०० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कायम रस्त्यावर असतात. विशेष म्हणजे ८५ वाहनांपैकी कुठलीही गाडी एक तासाच्या पुढे एकाच जागेवर असल्यास प्रशासन विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांना त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना खुलासा करणे बंधनकारक आहे. कारण न देऊ शकल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...