आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र नगरसेवकांची मते परिणामी ठरल्यास निवडणूक निकाल राखीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याप्रकरणी बीड न. पा.च्या उपाध्यक्षांसह १० नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री रणजित  पाटील यांनी अपात्र ठरवले हाेते. मात्र साेमवारी हाेणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना मतदानाची मुभा दिली हाेती. या अपात्रतेच्या निर्णयाला अाैरंगाबाद खंडपीठात अाव्हान देण्यात अाले हाेते. ‘विधान परिषद निवडणुकीत या सदस्यांच्या मतदानाचा अधिकार कायम राहील. मात्र त्यांच्या मतांचा  निकालावर परिणाम हाेत असेल तर ताे   निकाल जाहीर करू नये’, असे निर्देश न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी रविवारी दिले. अशा वेळी या निवडणुकीचा निकाल याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असेही अादेशात स्पष्ट करण्यात अाले.


उपनगराध्यक्ष हेमंत  क्षीरसागर, प्रभाकर पोकळे, सय्यद फारूख, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस, मोमीन अझरोद्दीन आणि रणजीत बनसोडे या काकू- नाना अाघाडीच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात अाली. या सदस्यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत कारवाईला खंडपीठात आव्हान दिले हाेते. लातूर- उस्मानाबाद- बीड या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतदार यादी ३ मे रोजी अंतिम झाली अाहे.  ‘एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये, असे सर्वाेच्च न्यायालयाने एका निवाड्यात स्पष्ट केले अाहे. त्यामुळे या १० सदस्यांचा मतदानाचा निर्णय कायम ठेवण्यात अाला अाहे’, असे निवडणूक अायाेगाने स्पष्ट केले हाेते. दरम्यान, राज्यमंत्र्यांनी या सदस्यांना १८ मे राेजी अपात्र ठरवले. त्या अादेशाची प्रत १९ मे राेजी सायंकाळी मिळाली, असे अॅड. तळेकर यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने या सदस्यांच्या मतदानाचा अधिकार कायम ठेवला.  मतमाेजणीत त्यांची मतेही मोजली जातील. मात्र या १० मतांमुळे निवडणूक निकालावर परिणाम होत असेल तर निकाल खंडपीठाच्या पुढच्या आदेशापर्यंत राखीव ठेवावा, असे अादेश न्यायालयाने दिले. याचिकेत शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...