आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दंगल घडवल्‍याचा आरोप, लच्छू पहिलवान गजाअाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटकेनंतर लच्छू पहिलवानच्या चेहऱ्यावर हास्य हाेते. - Divya Marathi
अटकेनंतर लच्छू पहिलवानच्या चेहऱ्यावर हास्य हाेते.

औरंगाबाद - राजाबाजार वॉर्डाच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांचे वडील लक्ष्मीनारायण बाखरिया (लच्छू पहिलवान) याला  बुधवारी रात्री अटक करण्यात आली. दुसरीकडे शुक्रवारी उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांची  विशेष शाखा (एसबी) सर्वाधिक टीकेची धनी झाली. दंगलीनंतर मात्र विभागाकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले.

 

परंतु पाच दिवस उलटूनही विशेष तपास पथक (एसआयटी) व्हिडिओ, छायाचित्रांवरच भर देत आहे. दरम्यान, दंगलीत रॉकेल, शस्त्रास्त्र पुरवणाऱ्यांची माहिती एसीबीने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तपास केवळ छायाचित्रे आणि व्हिडिओवरच केंद्रित झाला आहे का, असा सवाल पोलिसांच्या तपासावर उपस्थित होत आहे. दंगलीच्या तपासासाठी स्थापन विशेष तपास पथकाने (एसअायटी) लच्छू पहिलवानला गजाआड केले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी फिर्याद दिली असून सिटी चौक पोलिस ठाण्यात कलम ४३५, ४३६  यासह दंगल घडवण्याची कलमे लावण्यात आली आहेत. 

 

बाखरिया याचा दंगलीत सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर  ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री नवले यांच्या पथकाने त्याला  घरातून ताब्यात घेतले.  त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिस ठाण्यातही शिवसेनेचे मोठे नेते आणि कार्यकर्ते जमा झाले. दंगलीच्या वेळी एका गटाचे नेतृत्व तो करत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. याशिवाय दंगलीस कारणीभूत असलेल्या महिनाभरातील घटनांत सक्रिय सहभाग असल्याचा आरोपही त्याच्यावर होता. दुसऱ्या गटाचे नेतृत्व करणारा एमआयएम नगरसेवक फिरोज खान याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती.
   
रविवारपासून पोलिसांनी दंगलीचा तपास सुरू केला. प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन केली.  पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस उपायुक्तांसह गुन्हे शाखा, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश आहे. दंगलीत राजाबाजार, मोतीकारंजा, गांधीनगर,   नवाबपुरा, चेलीपुरा, चंपा चौक आदी जुन्या शहरात जाळपोळ, तोडफोड तसेच दगडफेक झाली.

 

मध्यरात्री बाराला दंगल सुरू झाल्याने दंगेखोरांचा शोध घेण्यापासून ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. परंतु एसआयटीने सुरुवातीपासून केवळ व्हिडिओ, छायाचित्रांच्या आधारेच शोध सुरू केला. दंगलीत काही भागांत रॉकेलचे मोठे साठे आढळून आले. काही ठिकाणी धारधार शस्त्रेही वापरली गेली. यासंदर्भात विशेष पथकांतर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवण्यात आली. परंतु याची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याचे एसबीतील सूत्रांनी सांगितले.  

 

अंधार, वीज गेल्यामुळे बहुतांश सीसीटीव्ही निरुपयोगी :   
अंधार, खंडित वीजपुरवठ्यामुळे बहुतांश सीसीटीव्ही निरुपयोगी ठरले. रात्री बारा वाजता सुरू झालेली दंगल सकाळी आठपर्यंत सुरू होती. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत  अंधार असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट चित्रण झालेच नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच दोन वाजेनंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणचे रेकॉर्डिंग झाले नाही. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही आधीच काढून घेतले जात आहेत. त्यामुळे व्हिडिओवर अवलंबून असलेले तपास पथक तपासासाठी जाताच त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडत आहे.

 

खबरे, एसपीओ गेले कुठे?
तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांतून विशेष पोलिस अधिकाऱ्यांची (एसपीओ) नियुक्ती केली होती. त्यांनी पोलिसांना आतील माहिती पुरवावी अशी अपेक्षा होती. परंतु दंगलीच्या तपासात आत्तापर्यंत ना गुप्त बातमीदार, एसपीअोंकडून कुठलीही ठोस माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पाच मुख्य डीव्हीआर भेटले, पण डेटाच डिलीट
राजाबाजार ते नवाबपुरा व गुलमंडी भागातील जाळपोळीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. परंतु पोलिसांनी जप्त करण्याआधीच डीव्हीआरमधील डेटाच डिलीट करण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसही चक्रावले. परंतु फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने डिलीट झालेला किंवा केलेला डेटा पुन्हा प्राप्त करता येतो. शहरातील फॉरेन्सिक सायन्स महाविद्यालयाकडे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. पोलिसांनी त्यांची मदत घेतल्यास अनेक डिलीट केलेला डीव्हीआर डेटा परत मिळवता येईल, असे तज्ज्ञांना वाटते.

 

२०० क्लिप हस्तगत
आतापर्यंत पोलिसांनी दंगल काळात नागरिकांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेल्या १०० ते १५० क्लिप हस्तगत केल्या आहेत. यासोबतच जवळपास ३० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेे फुटेजही मिळवले आहेत. परंतु यातील बहुतांश व्हिडिओमध्ये दंगलीचा कुठलाच भाग चित्रित झाला नसल्याचे समोर आले आहे.

 

नागरिकांनाच आवाहन
चौकशी, तपास सोडून व्हिडिओ, छायाचित्रावर भर दिला जात आहे. पाच दिवसांत प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे व्हिडिओ, छायाचित्रे मिळत नसल्यामुळेच बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे पोलिसांनी नागरिकांना दंगलीचे व्हिडिओ, छायाचित्रे ७७४१०२२२२२ व ८३९००२२२२२ या पोलिस आयुक्तालयाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केले आहे.

 

निरीक्षक हेमंत कदम, राजश्री आडे रुजू 
शुक्रवारी मध्यरात्री दंगलीदरम्यान सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम व बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे दगडफेकीत जखमी झाल्या. सिटी चौक पोलिस ठाण्यातूनच सध्या दंगलीच्या सर्व तपासाचा कारभार सुरू असून दंगलीचा मोठा भाग याच ठाण्याच्या हद्दीत येतो. कदम जखमी झाल्याने सुरेश वानखेडे यांच्याकडे सिटी चौकचा पदभार दिला होता. परंतु उपचार पूर्ण होताच कदम यांनी बुधवारी दुपारी  पदभार पुन्हा स्वीकारला. आडे यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. बुधवारी त्याही रुजू झाल्या. दरम्यान, सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा असली तरी अद्याप धोक्याबाहेर नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, निवडणुका जवळ आल्यावरच औरंगाबादेत दंगल का होते...

 

बातम्या आणखी आहेत...