आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चामुळे औरंगाबादकरांचे 5 तास प्रचंड हाल; वाहतूक ठप्प; वेळ, इंधनाची नासाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चासाठी मराठवाड्यासह बाहेरच्या जिल्ह्यांतून हजारो वाहने शनिवारी शहरात दाखल झाली होती. मोर्चेकऱ्यांनी जागा मिळेल तेथे रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावल्यामुळे जालना रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची पाच तास प्रचंड कोंडी झाली. ट्रॅफिकमध्ये तासन््तास थांबून राहावे लागल्यामुळे नागरिकांना ऊन, प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणावर इंधन जळाले. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 


क्रांती चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार होता. त्यामुळे सकाळपासूनच शहरात वाहने येण्यास सुरुवात झाली. जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणीसह अहमदनगर आणि जळगाव येथील हजारो मोर्चेकरी यात सहभागी झाले होते. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून जीप, ट्रॅव्हल्स, बस, कार आणि टेम्पोतून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे काल्डा कॉर्नर, क्रांती चौक, कोकणवाडी, सेंट्रल नाका, दिल्ली गेट, गणेश कॉलनी, चांदणे चौक, अमरप्रीत चौकासह अनेक भागांत रस्त्यावरच वाहने लावण्यात आली. त्यामुळे दिवसभर रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. 


वाहन दहा मिनिटे एकाच जागेवर
जालना रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी केल्याने चारचाकी वाहनांना जाण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता. जालना रोडच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जाणाऱ्या मोठ्या वाहनांना शहरातील इतर भागांत जाण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागता होता. दहा मिनिटांनंतर अवघे काही फूट गाडी पुढे सरकत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन जळाले. प्रदूषणही वाढले. मोर्चा मार्गावर वाहतुकीत बदल केला जाईल, असे वाहतूक विभागाकडून दोन दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते. त्यामुळे या भागात कमी रहदारी होती. मात्र ज्या ठिकाणी पर्यायी रस्ते होते त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला. 


कामाची वेळ आणि वाहतुकीची कोंडी
कार्यालयात जाण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांना या कोंडीला सामोरे जावे लागले. सभा सायंकाळी पाचच्या सुमारास संपल्यानंतर बाहेरून आलेली वाहने पुन्हा शहराबाहेर पडत होती. त्यामुळे वाळूज, हर्सूल, दौलताबादसह चिकलठाणा रस्त्यावर कोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली. दुपारी १२ ते पाच वाजेपर्यंत शहरातील वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. 


...तर आयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो
विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मैदानावर सभा घ्या, असे पोलिसांकडून आयोजकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, मनपाकडून ना हरकत मिळाल्यानंतर रहदारीस अडथळा होणार नाही या अटीवर आयोजकांना शुक्रवारी रात्री परवानगी देण्यात आली. तरीदेखील शनिवारी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मनपाकडून तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली. 


दिव्य मराठीचा प्रश्न : सर्वच राजकीय पक्षांनो, तुम्ही हे करू शकता का 
लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे, मोर्चा काढणे हा राजकीय पक्ष, संघटनांचा अधिकार आहेच. पण तो वापरताना सर्वसामान्य नागरिकांची होरपळ होणार नाही, याची काळजी मोर्चाचे आयोजक घेतील का? मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने येणारी वाहने खुल्या मैदानात पार्क करण्याची व्यवस्था केली. मोर्चेकऱ्यांनी तेथेच वाहने लावली तर शहरातील रस्ते मोकळे राहतील. शाळा, महाविद्यालये, नोकरीसाठी जाणाऱ्या तसेच आप्तांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना कोंडीत अडकावे लागणार नाही, अशा नियोजनाची संवेदनशीलता सर्वच राजकीय पक्ष यापुढे तरी दाखवतील का? 


पोलिस-आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव 
बाहेरून येणारी वाहने आमखास, कर्णपुरा मैदान व हर्सूल जेलच्या पुढे पार्क करावीत, अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना केल्या होत्या, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. आमखास मैदानावर आयोजकांनी स्वयंसेवक तैनात केले होते. मात्र, क्रांती चौकातून मोर्चा सुरू होणार असल्याने सर्वच वाहने तिकडे नेण्याची घाई सुरू होती. 


कारवाई केली 
वाहतुकीची कोंडी होऊ नये ११० कर्मचारी, १० अधिकारी आणि मी स्वत: रस्त्यावर होतो. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. 
- सी. डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा. 

बातम्या आणखी आहेत...