आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूल येथील एसपीओच्या घरातून ६ तोळे सोने, १२ हजार रोख चोरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जावयाच्या वास्तुशांतीसाठी हैदराबादला गेलेल्या हर्सूल परिसरातील सवेरा पार्क येथील विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी कुलपाचा कोंडा तोडून बेडरूमच्या कपाटातील सहा तोळे आणि बारा हजार रुपये रोख लंपास केले. परिसरात मोठे बंगले असून देखील कोणीही सीसीटीव्ही लावलेले नाही. 


जहांगीर कॉलनीतील सवेरा पार्क भागात मिनाज अहेमद सिद्दीकी (३६)यांचा तीन मजली बंगला आहे. जावई अहेमद सरवरी यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी मिनाज हे कुटुंबासह हैदराबादला गेले होते. घराच्या सर्व खोल्यांना स्लॅच लॉक होते. चोरट्यांनी समोरच्या रूमचा कडी कोयंडा कापून टाकत घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील चार कपाट टॉमीने फोडून त्यातील ऐवज पळवला. दुसऱ्या मजल्यावरील तीन लोखंडी कपाट फोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. चार तोळ्याचे मंगळसूत्र, सात ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग, तीन ग्रॅमचे कडे, दोन ग्रॅमचा हार आणि साडेतीन ग्रॅमचे कर्णफुले असे मिळून सहा तोळे सोने आणि बारा हजार रोख रक्कम चोरून नेली. मिनाज हे मंगळवारी पहाटे हैदराबाहून आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती हर्सूल पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक दिवाकर पाटील, कल्याण चाबूकस्वार यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या शिवाय गुन्हे शाखा, श्वान पथकातील डॉग स्वीटीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांना चोरट्यांचे ठसे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे सवेरा पार्क परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हर्सूल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 


पाळत ठेवून चोरी 
मिनाज हे सवेरा पार्कचे अध्यक्ष आहेत. तीन मजल्यावर दहा जणांचे कुटुंब राहते. सर्वजण बाहेरगावी गेल्याने पाळत ठेवून चोरट्यांनी डाव साधला. बंगला मोकळ्या जागेत असल्यामुळे चोरी झाल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले नाही. या भागात एकही सुरक्षा रक्षक नाही. यामुळे रात्री परिसर सामसूम असतो. 

बातम्या आणखी आहेत...