आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या थांबेनात; हडकोत सोन्याचे दुकान, जयभवानीनगरात घर फोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. पोलिसांना आव्हान देत शहराच्या विविध भागांत एकापाठोपाठ एक चोऱ्या सुरूच आहेत. चोरट्यांनी गुरुवारी रात्री हडकोतील सोन्या-चांदीचे दुकान फोडले, तर जयभवानीनगरात दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत मुद्देेमाल पळवला. उस्मानपुरा भागात सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


हडको टीव्ही सेंटर भागातील एम-२ मध्ये मुकेश अशोक सोनार-चाळीसगावकर (रा. एन-९, रेणुकामाता मंदिराजवळ, जळगाव रोड) यांचे भक्ती पर्ल्स अ‍ँड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे साडेनऊच्या सुमारास सोनार हे दुकानाला कुलूप लावून गेले. शुक्रवारी पहाटे तीन वाजून ४० मिनिटांनी हातात पोते, तोंडावर मुखवटा आणि हँडग्लोव्हज घातलेले दोन चोरटे दुकानाजवळ आले. या दोन्ही चोरांनी कटरने दुकानाचे चॅनल गेट कापले. नंतर त्यांनी सेंटर लॉक नसलेले शटर टॉमीने उचकटत आत प्रवेश केला आणि चांदीचे दोन ते तीन किलोचे दागिने लांबवले. दुकान फोडल्याची घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर दुकानमालक सोनार यांच्यासह कुटुंबीयांनी धाव घेतली. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे शाखा निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमोल देशमुख, शेख, भारत पाचोळे, विजय जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


जयभवानीनगरातील दुसऱ्या घटनेत खासगी कंपनीत कामाला असलेले करण रामराव नरोटे (२५, रा. जयभवानीनगर) यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. नरोटे कुटुंबीय झोपेत असल्याचे पाहून ११ जुलै रोजी मध्यरात्री चोरटा चॅनल गेट तोडून आत शिरला. या वेळी चोराने बेडरूममध्ये घुसून कपाटातील अकरा ग्रॅमचे नेकलेस, सोन्याचे नऊ ग्रॅमचे छोटे गंठण, २० तोळ्यांचे चांदीचे कडे आणि आठ हजारांची रोकड असा ऐवज लांबवला. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार नरोटे कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 


यापूर्वी सातारा, विद्यानगर, हर्सूलमध्ये चोऱ्या : संपूर्ण शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पंधरा दिवसांपूर्वी सिल्क मिल कॉलनीतील ठेकेदाराचे घर फोडून २० तोळे सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. पदमपुरा भागातही व्यापाऱ्याचे घर फोडले. हर्सूल येथील कुटुंब हैदराबादला गेले असता त्यांचा बंगला फोडला. हडको आणि जयभवानीनगरातही चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना आव्हान देत घरफोड्यांचे हे सत्र सुरूच आहे. मात्र अजून टोळी पकडण्यास पोलिस व गुन्हे शाखेला यश आले नाही. 


उस्मानपुऱ्यात टॉमीने उचकटले सेंट्रल बँकेचे एटीएम... 
धूम ठोकली. चोरट्याने लोखंडी टॉमीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आॅनलाइन मेसेज मुंबईतील शाखेला मिळाला. शिवाय आलार्मही वाजायला सुरुवात झाली. बँकेच्या मुंबई कार्यालयाने तत्काळ शहरातील पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. माहिती मिळताच उस्मानपुऱ्याचे सहायक फौजदार कल्याण शेळके यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ यांनी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सेंट्रल बँकेचे सहायक व्यवस्थापक सौरभ सोलंकी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 


सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपल्या दोन्ही चोरट्यांच्या छब्या, त्याआधारेच पोलिस घेणार शोध 
हडकोत सोन्या- चांदीचे दुकान फोडणारे दोन्ही चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्याआधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या चोरांनी दुकानातील पादुका, समई या वस्तू चोरल्या नाहीत. पोलिसांच्या मते ज्या वस्तू काळ्या बाजारात विकण्यासाठी सोप्या असतात त्याच त्यांनी चोरल्या. मात्र दुकानातील तिजोरीपर्यंत चोरटे पोहोचले नाहीत. अन्यथा त्यातील अर्धा ते एक किलो सोन्याचे दागिनेही त्यांनी लांबवले असते. 


तज्ज्ञ सांगतात, एटीएम फोडणे अशक्य 
एटीएम फुटू नये, चोरी होऊ नये याची काळजी घेतलेली असते. ते ऑनलाइन मुख्य व स्थानिक शाखेशी जोडलेले असते. प्रत्येक एटीएममध्ये कॅमेरा असतो. त्याला आठ आकडी लॉकही डिजिटल आहे. त्यापैकी चार डिजिट एका अधिकाऱ्याला तर चार डिजिट दुसऱ्या अधिकाऱ्याला माहिती असतात. 


स्वीटीला लागला नाही चोरट्यांचा सुगावा 
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान स्वीटीला पाचारण करण्यात आले होते. स्वीटीने सुमारे शंभर मीटरपर्यंत चोरांचा माग काढला. मात्र त्यापुढे ती जाऊ शकली नाही. त्यामुळे तिथून चोरटे दुसऱ्या वाहनाने पळून गेले असावेत, असा कयास आहे. 


४५० ते ४५० किलो वजनाचे एटीएम सहज उचलणे शक्य नाही. वेल्डिंग / गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला तर नोटा जळून जातील मात्र बाहेर निघणार नाहीत. हा लोखंडी बॉक्स तज्ज्ञांनाच लॉक शिवाय उघडता येऊ शकतो. ती वेळच येत नाही, असे इन्फिनिज कंपनीचे सीईओ अजय जोशी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...