आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०२४ मधील सिल्लोड येथील विधानसभा निवडणूक समीर सत्तार हेच लढतील...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे चिरंजीव समीर सत्तार यांना आमदार करणे. मात्र, समीरला कार्यकर्ता म्हणून आणखी पाच वर्षे काम करावे लागेल. त्यानंतरच त्याला सिल्लोडमधून लढता येईल. २०१९ मध्ये त्याला संधी नाही. २०२४ लाच तो विधानसभा लढू शकेल, असे आमदार सत्तार यांनीच गुरुवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. 


जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्यानंतरच डोक्यावरचे केस वाढवीन, असा पण आ. सत्तार यांनी यांनी केला आहे. तेव्हा दानवेंच्या विरोधात ते लढणार आणि सिल्लोडमधून चिरंजीव समीरला संधी देणार, अशी चर्चा आहे. आ. सत्तार यांनी जालना मतदारसंघातील वावरही वाढवला आहे. 


प्रदेशाध्यक्ष अशोकराव  चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक लक्षात घेता जालन्यातून उमेदवारी मिळवणे त्यांच्यासाठी अवघड गोष्ट नाही. स्वत: जालन्यातून लढल्यानंतर मुलाला सिल्लोड विधानसभेची संधी द्यायची, असा त्यांचा बेत असल्याचे बोलले जाते. 


या मुद्द्यावर बोलताना सत्तार म्हणाले, समीरला आमदार करण्यासाठी ही वेळ नाही. मी दहा वर्षे निव्वळ कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम केले अन् त्यानंतर मी आमदार झालो. आता तो कार्यकर्ता म्हणून गेल्या पाच वर्षांपासून काम करतोय. त्याची दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला आमदार करायचे की खासदार याचा निर्णय आपण घेऊ. अर्थात या वेळी सिल्लोड  विधानसभा मीच लढणार आहे. 


जालना येथील लोकसभा मतदारसंघामध्ये  खासदार रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची शपथ मी घेतली आहे. अर्थात उमेदवार मीच असेन, असे मी म्हणालो नव्हतो. काँग्रेस आमदाराकडून पराभूत करणार, असे माझे वक्तव्य आहे. माझा शब्द मी पूर्ण करीन, उमेदवार कोण असेल, याच्याशी मला काहीही देणे-घेणे नाही, असेही सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. 


२०२४ मध्येच समीरला संधी
समीरला २०२४ मध्ये संधी आहे आणि तेव्हा आपण पूर्णपणे प्रयत्न करू, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी या वेळी स्पष्ट केले. सत्तार अधिकृतपणे असे म्हणत असले तरी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास स्वत: जालन्यातून लोकसभेला, तर मुलगा समीर सिल्लोडमधून विधानसभेला असेल, असे त्यांचे नियोजन असू शकते. अर्थात त्याला प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचाही पाठिंबा असणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी केवळ विजयी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचे त्यांना वावडे असणार नाही. आणि कुठल्याही घराणेशाहीच्या आरोपाचा त्यांच्यावर परिणाम देकील होणार नाही, असे चित्र आहे. 

बातम्या आणखी आहेत...