आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन अडचणींमुळे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाइन स्वीकारणार, 72 हजार विद्यार्थ्यांना फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाइन अर्ज सबमिट होत नसल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी हे पोर्टल वारंवार हँग होत राहिल्यामुळे अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाइन स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी समाजकल्याण विभागाने घेतला. विद्यार्थ्यांना बुधवारपासून आपापल्या महाविद्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करता येतील. या निर्णयाचा जिल्ह्यातील ७२ हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे. 


केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींसाठी २०१३-१४ पासून ई-शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वेबसाइटवर अर्ज करावे लागत होते. यंदा सुरुवातीपासूनच ही वेबसाइट हँग होत होती. लॉगइनला अडचणी येत होत्या. यामुळे विद्यार्थी त्रस्त होते. यंदा ३० नाेव्हेंबर ही ऑनलाइन अर्जाची अखेरची तारीख होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता आले नाहीत. 


ऑनलाइन अर्जातील अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने मंगळवारी सामाजिक न्याय भवनमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. यात विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह विविध शैक्षणिक संस्थांचे १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी आॅनलाइन शिष्यवृत्तीसंबधी येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. शेळके म्हणाले, www.mahadbt.gov.in या पोर्टलवर काही त्रुटी आहेत, तर काही महाविद्यालयांच्याही त्रुटी आहेत. ही वेबसाइट उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, आदिवासी कल्याण विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने चालवली जाते. या वेबसाइटचे नियंत्रण शासनाकडे आहे. वेबसाइट हाताळण्याच्या ३ कार्यशाळा झाल्या आहेत. तरी यातील अडचणी सुटत नाहीत. यामुळे शासनाने शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाइन स्वीकारण्याची परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. यासंबंधी बुधवारी मुंबईत आणखी एक बैठक होणार असल्याचे शेळके म्हणाले. 


या शिष्यवृत्ती योजनांसाठी करा अर्ज 
- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना. 
- मॅट्रिकोत्तर शैक्षणिक शुल्क-परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. 
- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (इयत्ता ११ वी व १२ वी). 
- सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना. 
- राज्य शासनाची मॅट्रिकपूर्व शैक्षणिक शुल्क- परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. 
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. 


आजपासून प्रारंभ, अंतिम तारीख अनिश्चित 
ऑनलाइनसाठी सादर केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट विद्यार्थ्यांकडे आहे. त्याचीच एक प्रत आता विद्यार्थ्यांना आपापल्या महाविद्यालयात सादर करावी लागेल. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. किती दिवस अर्ज स्वीकारायचे याबाबत सूचना आलेली नाही, असे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी शेळके म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...