आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुती भागवत खुनाच्या तपासावर कोर्टाचे ताशेरे,सीआयडीच्या महानिरीक्षकांनी शपथपत्र द्यावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या निगराणीत श्रुती भागवत खून खटल्याचा तपास पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मात्र या आदेशाचे पालन झाल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकणवाडी यांनी नोंदवले. आता गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे यांनी आठवड्यात शपथपत्र दाखल करावे. शपथपत्रावर खंडपीठाचे समाधान न झाल्यास त्यांना व्यक्तीश: खंडपीठात हजर राहावे. खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करतात, तपास कशा पद्धतीने करणार याचा खुलासा करावा. विहित कालावधीत तार्किक समाधानापर्यंत पोहोचला नाही तर सीआयडीसारख्या तपास संस्थेवर विश्वासच राहणार नसल्याचे ताशेरे खंडपीठाने आेढले. 

 

श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करावा, सीआयडीच्या औरंगाबाद पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली सहा महिन्यांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी ७ एप्रिल १७ रोजी दिले होते. प्रकरण २०१२ मध्ये घडलेले असल्याने जलदगतीने तपास संपवून १० ऑक्टोबर २०१७ रोजी आदेश पूर्ततेचा अहवाल खंडपीठात सादर करावा. तपासासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे यांनी सातत्याने लक्ष ठेवावे असेही आदेशात नमूद केले होते. 


मृताच्या भावाची याचिका : श्रुती यांचा भाऊ मुकुल करंदीकर यांनी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अॅड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत दाखल केली होती. घटनास्थळी सापडलेल्या टेलरच्या पावतीवरूनच शिलाई केलेला ड्रेस पोलिसांचा असल्याची शक्‍यता वर्तवली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे श्रुती यांच्याकडे कामाला असलेली नोकर महिला खून झाल्यापासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला नाही. अशा अनेक बाबी याचिकेत निदर्शनास आणून दिल्या होत्या. या पूर्वीच्या सुनावणीत ४ एप्रिल २०१७ पर्यंत राज्य शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. 


पोलिसांना तपासात अपयश 
श्रुती भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी उल्कानगरीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये खून करण्यात आला होता. या खुनाला चार वर्षे झाली तरीही जवाहरनगर पोलिस, गुन्हे शाखा व सायबर सेलकडून तपासाचा उलगडा करण्यात अपयश आले होते. 


त्रुटींचा अहवाल सादर 
खंडपीठात सादर करण्यात आलेल्या अहवालात मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याने विलंब होत असल्याचे स्पष्ट केले. अनेक ठिकाणी तपास केल्यानंतर मृताच्या मोबाइलमधील मेसेज डिलीट झाले आहेत. पोलिसांना डाटा व्यवस्थितपणे हस्तगत करता आलेला नाही. मोबाइल डम्प डाटा तपासातही अनेक त्रुटी राहिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व डाटा मिळवण्याचा प्रयत्न सीआयडीमार्फत करण्यात येत आहे. भागवत यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या मैत्रिणींचा जाब जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. गुन्हा घडून आता पाच वर्षे झाल्याने तपासात अडचणी येत असल्याने वेळ लागत आहे. 

बातम्या आणखी आहेत...