आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पुन्हा हल्लेखोर वाघाच्या दहशतीखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मानव-वन्यप्राणी संघर्षाचा सातत्याने सामना करीत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्र पुन्हा एकदा हल्लेखोर वाघाच्या दहशतीखाली आले असून मागील काही महिन्यात हल्लेखोर वाघाने परिसरातील किमान सात जणांचा बळी घेतला आहे. या घटनांची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लेखोर वाघाचा शोध घेण्याचे निर्देश वन विभागाला दिले आहेत. 


सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे वाघाने अनुबाई चौखे या महिलेस ठार मारल्याच्या रविवारच्या ताज्या घटनेची दखल घेऊन वाघाची ओळख पटविण्याचे आदेश वन विभागाला देण्यात आले आहेत. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही क्षेत्रात डिसेंबरपासूनच हल्लेखोर वाघाचा उपद्रव सुरु झाला. हल्लेखोर वाघाने एका इसमाचा बळी घेतल्यावर यावर्षी जानेवारी महिन्यात मुरमाडी गावातील गीना पेंदाम या महिलेस वाघाने ठार मारले. तर १३ मार्च रोजी किन्ही येथील गोविंदा भेंडारे याचा वाघाने बळी घेतला. १० मे रोजी वाघाने मुरपार येथे एका अनोळखी इसमाचा बळी घेतला. मात्र, जून महिन्यात हल्लेखोर वाघाचे हल्ले आणखी वाढले. ३ जून रोजी हल्लेखोर वाघाने मुरमाडी गावातील महादेव गेडाम याला ठार मारले तर १५ जून रोजी किन्ही गावातील एका महिलेस ठार मारल्याची घटना घडली होती. 


या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने यापूर्वीच परिसरात मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्यातून काही वाघांची छायाचित्रे उपलब्ध झाली असली तरी त्यातील हल्लेखोर वाघ नेमका कोणता, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी दिली. या घटना अतिशय गंभीर असून हल्लेखोर वाघाची ओळख पटल्यास राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...