आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक हेराफेरी : बनावट नव्हे, खऱ्या चेकवर केमिकल वापरून टोळीने केले बँक खातेबदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बनावट चेक बनवणाऱ्या टोळीने शहरातील १९ बँकांत अकाउंट उघडले असून त्यापैकी पाच बँकांत चेक (धनादेश) टाकले होते. त्यापैकी दोन बँकांनी रक्कम देऊ केली, तर दोन बँकांना वर्तमानपत्रांतील बातम्या वाचल्यावर संशय आल्याने त्यांनी व्यवहार थांबवला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून पोलिस मास्टरमाइंडच्या शोधात आहेत.

 
दरम्यान, फेब्रुवारी २०१८ मध्ये याच टोळीने अहमदाबाद (गुजरात) येथील एका बँकेच्या टीपीनगरमधील शाखेतून चार कोटी रुपये खऱ्या चेकवर केमिकलने खाडाखोड करत घशात घातले होते. त्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी वसई, पालघर येथून पाच जणांना अटक केली. गेल्या आठवड्यात औरंगाबादेत आणि गुजरात पोलिसांनी अटक केलेले वेगवेगळे आहेत. मात्र, दोन्ही टोळ्यांची कार्यपद्धती लक्षात घेता त्यांचा मास्टरमाइंड एकच असावा, असा पोलिसांचा संशय आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेला टोळीचा सदस्य हरीश गोविंद गुंजाळ मे महिन्याच्या अखेरीस औरंगाबादेत आला. येथे त्याने कागदपत्रे सादर करून १९ बँकांमध्ये हरीश एंटरप्रायझेस नावाने खाती उघडली. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याने टीजेएसबीच्या (ठाणे जनता सहकारी बँक) सिडको शाखेचा तीन लाख ९३ हजार रुपयांचा एक खरा चेक मिळवला. त्यावर केमिकलने खाडाखोड करून मूळ खातेधारकाऐवजी हरीश एंटरप्रायझेसचे नाव टाकले आणि रक्कम उचलली. त्यानंतर एक दिवसाने त्याने अशाच पद्धतीने कर्नाटक बँकेतून दोन लाखांचा चेक टाकत पैसे खिशात घातले, अशी माहिती तपासात समोर आल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. 


एसएमएस येताच चक्रावले 
या टोळीतील सदस्य हरीश गुंजाळने पारिजातनगर (गारखेडा) येथील टीजेएसबी बँकेत खाते काढले होते. १ जून रोजी त्याने तेथे गोजीत फायनान्स सर्व्हिसेस या नावाने एर्नाकुलम (केरळ) येथील युनियन बँक ऑफ इंडियाचा चेक वटवण्यासाठी टाकला आणि ३ लाख ९३ हजार २६४ रुपये काढून घेतले होते. करंट अकाउंटमधून उर्वरित पान.६ 


क्रमांक चुकीमुळे पर्दाफाश 
ही टोळी खरा चेक मिळवून त्यावर केमिकलने खाडाखोड करून त्यांना हव्या त्या खातेधारकाचे नाव टाकत होती. चेकचा क्रमांकही बदलून टाकत होती. गोजीत फायनान्स चेक क्रमांक त्यांनी बदलला. पण मूळ खातेधारकाकडे चेकची नोंद असल्याने बनवाबनवी उघड झाली. 


चेक खरे, पण खाडाखोड 
या टोळीने बँकेत टाकलेले चेक हे खरे होते. ते या टोळीने छापले नव्हते. तर विविध बँकांत खाते उघडल्यानंतर मिळणाऱ्या चेकमध्ये त्यांनी केमिकलने खाडाखोड केली. बँकेवरील चेक नंबर, पत्ता खोडून त्यावर त्यांना हव्या असलेल्या शाखेचा पत्ता व चेक नंबर टाकून तो डिपॉझिट करत होते. त्यामुळे हा चेक बँकेच्या तपासणीत सहज पास होत होत असल्याचे तपासात समोर आले. 


मोठे उद्योजक, व्यापारी रोजचा व्यवहार करताना तीन-चार पुरवठादार किंवा कंपन्यांना चेक देत असतात. आपण नेमका किती क्रमांकाचा चेक कोणाला दिला, याची तपशीलवार नोंद चेकबुकवर करण्याची सुविधा आहे. ती वापरलीच पाहिजे. चेकद्वारे पेमेंट झाल्याचा बँकेतून मोबाइलवर एसएमएस येताच चेकबुकवरील क्रमांक पडताळून पाहिला पाहिजे. तसे केल्यास फसवणूक टळू शकते. आर्थिक फटका बसण्यापासून तु्म्ही वाचू शकता, असे पोलिसांनी सांगितले.


बातम्यांमुळे जागरूकता 
२८ जून रोजी टोळीतील पाच जणांच्या अटकेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे बँका जागरूक झाल्या. साऊथ इंडियन बँक, सिंडिकेट, इंडियन ओव्हरसीज बँकेने असेे संशयित चेक थांबवले. पाचपेक्षा अधिक बँकांची टोळीने फसवणूक केली असावी, असा संशय आहे. मात्र अजून टीजेएसबी वगळता एकाही बँकेने तक्रार दिली नाही. 


तज्ज्ञ टोळीत सामील 
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांपैकी एकही जण उच्चशिक्षित नाही. बँकेच्या व्यवहाराचे खूप माहीतगार असावेत, असेही प्राथमिक तपासात दिसले नाही. त्यामुळे बँकांचे चेकद्वारे होणारे व्यवहार पाळामुळांसकट माहिती असलेला तज्ज्ञ टोळीत सामील असावा, असा पोलिसांचा संशय आहे. 


सीआयडीला अहवाल 
कोणत्याही खातेदाराचे मूळ धनादेश या टोळीच्या हातात कसे पडत होते, हा औरंगाबादच्या पोलिसांसमोरील मूळ प्रश्न आहे. अटक केलेल्यांकडून त्याचे उत्तर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय त्यांनी सीआयडीलाही या प्रकरणाची माहिती देणारा अहवाल पाठवला आहे. अशा प्रकारची टोळी सध्या किंवा पूर्वी देशात अन्य कुठे कार्यरत होती का, याची माहिती मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...